बांद्याच्या माजी सरपंचांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 02:38 PM2020-04-20T14:38:28+5:302020-04-20T14:39:12+5:30
आपल्या जमिनीत कुंपण का घातले अशी विचारणा केल्यावरून बांद्याचे माजी सरपंच मंदार कल्याणकर यांना मारहाण झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. कल्याणकर यांनी बांदा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून रामचंद्र वामन म्हाडगुत, संगीता रामचंद्र म्हाडगुत व जयेश रामचंद्र म्हाडगुत (तिघेही रा. बांदा-देऊळवाडी) यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांदा : आपल्या जमिनीत कुंपण का घातले अशी विचारणा केल्यावरून बांद्याचे माजी सरपंच मंदार कल्याणकर यांना मारहाण झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. कल्याणकर यांनी बांदा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून रामचंद्र वामन म्हाडगुत, संगीता रामचंद्र म्हाडगुत व जयेश रामचंद्र म्हाडगुत (तिघेही रा. बांदा-देऊळवाडी) यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बांदा पोलिसांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी मंदार कल्याणकर हे आपल्या मालकीच्या जमिनीत पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी आपल्या जमिनीत कुंपण का घातले असा सवाल त्यांनी म्हाडगुत यांना केला.
यावरून रामचंद्र म्हाडगुत व संगीता म्हाडगुत यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जयेश म्हाडगुत याने अंगावर धावून जात दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत कल्याणकर यांना गंभीर दुखापत झाली आहे. कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बांदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शनिवारी त्या संशयितांपैकी एकाला न्यायालयासमोर हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले.