सावंतवाडी: आंबोली कावळेसाद येथील दरीत युवक व युवतीचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. हे दोन्ही मृतदेह साधारणपणे एक महिन्यापूर्वीचे असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एक महिन्यापूर्वी पोलिसांना कावळेसाद जवळ एक दुचाकीही मिळाली होती. त्याचीच ही दुचाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरूवारी सायंकाळी हे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत आंबोलीत आठवडा भरात चार मृतदेह सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा मृतदेह आंबोलीतील कावळेसाद येथील दरीतून काढत असताना तेथे आणखी दोन मृतदेह असल्याचे आपत्कालीन पथकाने पोलिसांना सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी आपत्कालीन पथकाला दरीत उतरून मृतदेह शोधण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे सांगेलीतील आपत्कालीन टिम दरीत उतरली होती.सकाळपासून या पथकाने शोधमोहीम हाती घेतली. त्यांना सायंकाळी हे मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र मृतदेहाचे अवशेष शिल्लक राहिले होते. दोन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. आपत्कालीन पथकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एक मृतदेह युवकाचा तर दुसरा युवतीचा असल्याचे सांगितले. मृतदेहाच्या अवशेषांवर फक्त कपडेच होते. सायंकाळी उशिरा मृतदेह दरीतून वर काढल्यानंतर वैद्यकीय तपासणी घटनास्थळीच करण्यात आली.दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिन्याभरापूर्वी एक दुचाकी या परिसरात आढळून आली होती. या दुचाकीवरून युवक व युवती आली होती. या दोघांनाही परिसरात पाहिले आहे. ती आंबोलीतील एका हॉटेलात राहिल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. ही दुचाकी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सावर्डे येथील मोरे नामक व्यक्तीच्या नावावर आहे. ती दुचाकी मुरगूड पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ही दोघे सावर्डे येथीलच असावेत, असा अदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिसांनी दुचाकीवरून मृतदेह सावर्डे येथील असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर शुक्रवारी मोरे याना आंबोली येथे बोलावण्यात आले आहे. ते आल्यानंतरच नेमकी वस्तूस्थिती काय ती कळू शकेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, पोलीस हेडकाँस्टेबल विश्वास सावंत, अमोद संरगले, प्रकाश कदम, तानाजी देसाई आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तर सांगेली येथील आपत्कालीनचे बाबल आल्मेडा, नार्वेकर आदींनी शोध घेतला आहे.
आंबोली परिसरात आठवड्यात सापडले चार मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 12:09 AM