कणकवली : कोकणातील विद्यार्थ्यांचा दहावी, बारावीमध्ये अव्वल क्रमांक असतो. त्यानंतर पुढच्या कालावधीत योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये मागे पडतात. त्याचा परिणाम कोकणातील विकासावर होत आहे. जर प्रशासनात उच्च पदस्थ अधिकारी हे कोकणातील असले तर स्थानिक समस्या आणि विकासाची गरज याचा ताळमेळ बसेल. मग आम्हाला चिखलफेकीसारखी आंदोलने करावी लागणार नाहीत.
कोकणचा विकास आणि जिल्ह्यातील तरुणांना दिशा देण्यासाठी कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन ठिकाणी मोफत ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करत असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्पर्धा परिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रा. गणेश काटकर, अॅड. अमोल गवळी, ड्रीम फाऊंडेशनचे प्रा. सुशिल अहिरराव आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, मी गेली काही वर्षे शिक्षण तज्ज्ञांना भेटून कोकणातील तरुण-तरुणींना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करावे लागेल? याची चाचपणी करत होतो. त्याचा परिपाक म्हणून ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आता सुरु करण्यात येत आहे. ड्रीम फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा केंद्र काम करेल.आता शासकीय ८० हजार पदांची भरती होत आहे. तर दुसरीकडे खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे प्रशासनात जास्तीत जास्त अधिकारी, कर्मचारी कोकणातील असावेत. ही आपली भुमिका आहे.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षांबाबत जनजागृती झाल्याने प्रशासनात मोठी भरती या भागातील लोकांची झाली. मात्र, प्रशासनाच्या कुठल्याही विभागाचा कारभार पाहिला तर हे अधिकारी आपल्या खुर्चीला किती न्याय देतात? हे आपण पाहत आहोत.
कोकणच्या मातीबद्दल त्यांना प्रेम नसल्याने येथील जनतेबद्दलही त्यांना आस्था नाही. हे चित्र बदलायचे असेल तर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी कोकणातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या बाबत जागृती करावी लागेल . त्यामुळे प्रशासनात दाखल होण्याची संधी आपण या केंद्राच्या माध्यमातुन येथील तरुणांना देणार आहोत. असे नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.
या ज्ञानसंगम स्पर्धा परीक्षा केंद्रात सहभाग घेण्यासाठी १२ सप्टेंबर ते १ आॅक्टोंबर या कालावधीत नाव नोंदणी करायची आहे. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज, वैभववाडी येथे महाराणा प्रताप सांस्कृतिक कला दालन, देवगड येथे वॅक्स म्युझियम तिसरा माळा या तीन ठिकाणी ही मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन केंद्रात सहभाग व्हावे असे आवाहनही यावेळी नीतेश राणे यांनी केले.