देवगड : परराज्यातील पर्ससीन हायस्पीड ट्रॉलरना सिंधुदुर्गात मच्छिमारी करायला बंदी असूनही आदेश डावलून सिंधुदुर्गात मच्छिमारी केली जाते. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका देवगड येथे पकडली होती. त्यापाठोपाठ कर्नाटक उडपी येथील हायस्पीड नौका देवगड तालुक्यात काळोशी-गिर्ये येथे खोल समुद्रात पकडण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने मत्स्य विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली.शासनाचा बंदीचा आदेश डावलून परराज्यातील हाय स्पीड ट्रॉलर देवगड येथील समुद्रात बेसुमार मच्छिमारी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना याचा फटका बसत आहे. रात्री उशिरा मत्स्यविभागाला माहिती प्राप्त झाल्यानंतर मत्स्य विभागाचे मालवणकर व सागरी सुरक्षा रक्षक यांच्यासह खोल समुद्रात जात काळोशी गिर्ये येथील समुद्रात रात्री उशिरा हा ट्रॉलर पकडण्यात आला.कोणतीही साधने नसताना मत्स्य विभाग व सुरक्षारक्षकांनी ही परराज्यातील नौका पकडली. मात्र, त्यांचा पाठलाग इतर परराज्यातील बोटीने केला. असे असूनही हा ट्रॉलर देवगड बंदरात आणत मत्स्य विभागाने कारवाई केली.या ट्रॉलरवर वेगवेगळ्या वीस प्रजातीची मच्छी आढळली. त्या मच्छीचा लिलाव करून हा लिलावाची रक्कम दंड स्वरूपात उभारण्यात येणार असल्याचे मत्स्य परवाना अधिकारी यांनी सांगितले. पकडण्यात आलेला ट्रॉलर हा कर्नाटक राज्यातील उडपी येथील असून सुदर्शन असे त्याचे नाव आहे.
शासनाच्या आदेश डावलून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बेसुमार मच्छिमारी परराज्यातील मच्छिमार करत आहेत. मात्र, यांच्यावर कारवाई करण्यात शासन आपलेच काही रक्षक असल्याने हात आखडते घेत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार संजय बांदेकर यांनी केला आहे.