सुरक्षा रक्षकांना न्याय द्या, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडविणार, बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:17 PM2020-09-05T16:17:30+5:302020-09-05T16:20:38+5:30
सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्यावतीने येथे देण्यात आला.
सावंतवाडी : सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्यावतीने येथे देण्यात आला.
दरम्यान, आमचे पगार थकवून शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? असाही सवालही यावेळी संतप्त सुरक्षा रक्षकांनी केला. आम्हांला न्याय हवा आहे. आमच्या मागण्या मान्य करा, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्या माध्यमातून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विजय गुरव, उपाध्यक्ष विद्याधर रेडकर, सचिव संजय देऊलकर, सदस्य भूषण परब, नितीन कांबळे, उमेश वाडकर, अनिल सावंत, संजय गावडे, संदेश नारकर, जगन्नाथ केळुसकर, अमित घाडी, तुकाराम सावंत, अभय आईर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष विजय गुरव म्हणाले, सुरक्षा रक्षकांना न्याय दिला पाहिजे. सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू. सुरक्षा रक्षकांना पगार द्या. गरीब कामगारांचा पगार थकवून काय मिळणार? अशी विचारणाही गुरव यांनी केली. तसेच आम्हांला न्याय दिला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी गुरव यांनी दिला. बांधकामच्या कार्यालयीन सचिव यांच्याकडे निवेदन दिले.