जानवली येथे गोवा बनावटीची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:21 PM2020-01-10T22:21:04+5:302020-01-10T22:21:25+5:30
गोवा बनावटीची दारू व दारू वाहतूक करणारी १० लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका असा १६ लाख ८८ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कणकवली : कणकवली शहरापासून जवळच मुंबई -गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स समोर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करीत ६ लाख ८८ हजार २०० रुपयांची गोवा बनावटीची दारू व दारू वाहतूक करणारी १० लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका असा १६ लाख ८८ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. तसेच या प्रकरणी मूळ राजस्थान येथील रहिवासी गोविंद पुखराज कुमावत (वय३३, सध्या राहणार कर्वेनगर, पुणे )व प्रताप रामलाल गोदावास(वय २२ , रा. कर्वेनगर, पुणे ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रुग्णवाहिका क्रमांक (एम.एच. ०९- बी. सी. ३२४६)मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार जानवली येथे संबधित रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यामध्ये ८० बॉक्स आढळून आले. त्यात विविध प्रकारच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे बॉक्ससह रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कणकवली निरीक्षक एस. ए. भगत, गोपाळ राणे, जे. आर. चव्हाण, स्नेहल कुवेसकर, साजिद शहा, खान यांनी केली.