सावंतवाडी : सन्मान झाला तरच जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवू, अन्यथा आम्ही राष्ट्रवादी म्हणून वेगळा विचार करू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मांडली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीतील पुनरावृत्ती याठिकाणी पुन्हा होणार नाही, याची खबर शिवसेनेच्या नेत्यांनी घ्यावी, तशी त्यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समज द्यावी, असाही सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, बाळ कनाययळकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दर्शना बाबर-देसाई, हिदायतुल्ला खान, कुतुबुद्दीन शेख, नवल साटेलकर, अशोक पवार, ऑगस्तीन फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू, जावेद शेख, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.सामंत म्हणाले, महाविकास आघाडीकडून निवडणूक काळात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळे यापुढे सन्मान झाला तरच आम्ही जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहू, अन्यथा आम्ही राष्ट्रवादी म्हणून वेगळा विचार करू, तर ग्रामपंचायत निवडणुकीतील पुनरावृत्ती या ठिकाणी पुन्हा होऊ नये, यासाठी शिवसेनेने खबरदारी घ्यावी, अनेक वेळा वरिष्ठ नेते चर्चा करतात, तर खालील नेते आम्हाला विश्वासात न घेताच कोणताही निर्णय घेतात, ते योग्य नसून सर्वांमध्ये समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी ही प्रत्येक पक्षाची आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढण्याची तयारीही केली होती. पण, शिवसेनेच्या नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचेही यावेळी सामंत यांनी सांगितले. त्यामुळे राज्यपातळीवर जरी आघाडीत असलो, तरी जिल्हापातळीवर आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याची टीकाही सामंत यांनी यावेळी केली आहे.राष्ट्रवादी सावंतवाडी शहराध्यक्षपदी टेमकरराष्ट्रवादीच्या सावंतवाडी शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक देवेंद्र टेमकर, तर पदवीधर मतदारसंघ सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी प्रसाद दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
जिल्हा बँक निवडणुकीत ग्रामपंचायतीची पुनरावृत्ती नको :अमित सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:37 PM
Ncp Shivsena Sawantwadi Sindhudurg- सन्मान झाला तरच जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवू, अन्यथा आम्ही राष्ट्रवादी म्हणून वेगळा विचार करू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मांडली.
ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणुकीत ग्रामपंचायतीची पुनरावृत्ती नको :अमित सामंत शिवसेना नेत्यांनी कार्यकर्त्यांना समज द्यावी