Sindhudurg: कासार्डे येथे छापा टाकून ४६ हजारांचा गुटखा केला जप्त, संशयित आरोपी ताब्यात
By सुधीर राणे | Published: April 19, 2024 12:54 PM2024-04-19T12:54:03+5:302024-04-19T12:54:26+5:30
कणकवली : कासार्डे ,दक्षिण गावठण येथे बेकायदा पानमसाला गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. ...
कणकवली : कासार्डे ,दक्षिण गावठण येथे बेकायदा पानमसाला गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता ४६ हजार ८० रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा जप्त करण्यात आला. तसेच संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आदिनाथ महावीर कऱ्हाडे (वय-३०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही कारवाई काल, गुरुवारी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना कासार्डे येथे विमल पान मसाल्याचा अवैधरीत्यासाठा केला असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक आर.बी. शेळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. बी. कोयंडे, हवालदार पी. एस. कदम, डिसोजा यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली.
संशयित कऱ्हाडे याच्या घराच्या शेजारी असलेल्या खोपीतून पिशवीत ठेवलेला ४६ हजार ८० रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा जप्त करण्यात आला. संशयित कऱ्हाडे याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार राजेंद्र जामसंडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच कऱ्हाडे याला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.