हंसराज गवळे यांच्या चित्रकलेचा दिल्लीत गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 05:28 PM2020-02-27T17:28:55+5:302020-02-27T17:30:09+5:30
दिल्ली येथे आॅल इंडिया फाईन आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटी गॅलरीत चित्र व शिल्प प्रदर्शन पार पडले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्र. ५चे उपक्रमशील तथा कलाप्रिय शिक्षक हंसराज गवळे यांच्या कलेची विशेष दखल या प्रदर्शनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
बांदा : दिल्ली येथे आॅल इंडिया फाईन आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटी गॅलरीत चित्र व शिल्प प्रदर्शन पार पडले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्र. ५चे उपक्रमशील तथा कलाप्रिय शिक्षक हंसराज गवळे यांच्या कलेची विशेष दखल या प्रदर्शनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
या चित्र प्रदर्शनाचे उद््घाटन जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यु आॅफ युनिटीचे निर्माते शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या हस्ते झाले. त्यांनी हंसराज गवळे यांच्या चित्र व शिल्पाचे विशेष कौतुक करताना अध्यापनाचे काम करता-करता इतक्या उंचीवरची चित्रकला निर्मिती केल्याबद्दल गौरवोद््गार काढले.
गवळे यांनी या अगोदरही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करून तालुका व जिल्ह्याच्या नावलौकिकात विशेष भर घातली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार एस. बी. पोलाजी यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने आपले अध्यापनाचे काम सांभाळून मिळवलेले यश हे नक्कीच उल्लेखनीय असल्याने शिक्षण विभागातून त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर व केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर व मुख्याध्यापक धनंजय केरकर यांनी अभिनंदन केले आहे.
दगडासोबतच लाकडापासून बनविल्या कलाकृती
हंसराज गवळे यांनी या चित्र व शिल्प प्रदर्शनात दगडासोबतच लाकडापासून बनविलेल्या कलाकृती मांडल्या आहेत. त्याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, जंगलात पडलेल्या लाकडांवरील नैसर्गिक आकृत्यांचा वापर करून मी कलाकृती घडवितो. काही वेळा त्यातील नैसर्गिक आकृत्या वापरतो, तर काहीवेळा त्यात भर घालावी लागते. प्रदर्शनात त्यांची मांडणी करताना विशिष्ट थीम सादर केली आहे.