नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का? शासनाला केला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:22 PM2020-01-10T19:22:19+5:302020-01-10T19:26:15+5:30
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून, हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का ? असा सवाल कृषीभूषण एम. के. गावडे यांनी उपस्थित केला.
वेंगुर्ला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून, हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का ? असा सवाल कृषीभूषण एम. के. गावडे यांनी उपस्थित केला.
वेतोरे येथील श्री देवी सातेरी सहकारी सोसायटीतर्फे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सभा वेतोरे सोसायटीच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन विजय नाईक, कृषी उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी शिवराम गोगटे, संतोष गाडगीळ, प्रगतशील शेतकरी सुशांत नाईक, चंद्रकांत वालावलकर, उत्तम वालावलकर, विश्वनाथ गावडे, समीर गोसावी, वर्षा नाईक, गीता गावडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व सभासद उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५००० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. क्यार नावाच्या चक्रीवादळाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. जिल्ह्यातील कापणीस तयार झालेल्या भातपिकाचे जवळपास ६० टक्के पूर्ण नुकसान झाले. भातपिकासोबतच अन्य खरीप पिके, भाजीपाला व कंदवर्गीय पिके या सर्वांचेच अतोनात नुकसान झाले.
ढगफुटीप्रमाणे अवेळी कोसळणारा पाऊस बागायती पिकांसाठीदेखील कर्दनकाळ ठरला आहे. जानेवारी महिन्याची १०
तारीख उजाडली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के आंबा बागायतींना अजून मोहोर आलेला नाही. आता यापुढे जरी हवेत गारठा वाढला तरीही आंब्याचा संपूर्ण हंगाम किमान ५० दिवसांनी पुढे गेला आहे. याचा अर्थ मे अखेरीस आंबा आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल.
जूनपासून पुन्हा पावसाची चाहूल लागणार असल्याने आंबा फळे खराब होण्याची भीती दिसत आहे. आंब्यात एक वर्ष आड मोठी फळधारणा होत असल्याने पुन्हा पुढच्या वर्षीसुद्धा ही झाडे व्यवस्थित फळे देतील याची खात्रीनाही.
परतीच्या व अवकाळी पावसामुळे जूनपासून झाडांवर केलेला खर्च पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सहकारास जागत प्रसंगी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र, स्वत:चा दागिना मोडून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केली. त्यामुळे कर्ज नियमित भरणे हा त्यांनी गुन्हा केला की काय अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे, असेही यावेळी गावडे यांनी सांगितले.
सातेरी सोसायटीने उठविला आवाज
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री देवी सातेरी सहकारी सोसायटी वेतोरे या संस्थेने सर्वप्रथम आवाज उठविला आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य सहकारी सोसायट्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन सभासदांची बैठक आयोजित करून त्याबाबत योग्य तो ठराव शासनाकडे देण्यात यावा, असे आवाहन वेतोरे सोसायटीचे माजी चेअरमन उत्तम वालावलकर यांनी केले आहे.