कणकवली : राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाला घाबरून घराच्या बाहेर येत नाहीत. मात्र, जेथे रुग्णालयात पाऊल ठेवण्यास लोक धजावत नाहीत.तेथे तुम्ही आयुष्याची पर्वा न करता आरोग्य सेवा देत आहात . गेले ८ महिने सरकार नावाची यंत्रणाच अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे. अशावेळी आरोग्य कर्मचारी कोरोना विरोधात पाय रोवून ठामपणे उभे राहिले आहेत. हे कौतुकास्पद असून आरोग्य कर्मचारी सक्षम ठरले आहेत. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी येथे केले .कोरोना महामारीत चांगली आरोग्य सेवा देणारे डॉक्टर,आरोग्य सेवक, १०८ रुग्ण रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टर यांचा सत्कार कणकवली नगरपंचायतच्यावतीने गुरुवारी करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,मुख्याधिकारी विनोद डवले,उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक अभिजित मुसळे, कविता राणे , बंडू हर्णे, शिशिर परुळेकर, प्रतीक्षा सावंत,मेघा सावंत आदी उपस्थित होते.यावेळी आमदार राणे म्हणाले, गेल्या ८ महिन्यात तुम्ही जी सेवा केली. त्यासाठी आपले धन्यवाद मानण्यासाठी हा कार्यक्रम आहे.कोणतीही घटना घडली तर वेळ काळ न पाहता आम्ही दूरध्वनी करायचो. आपण त्याला कार्यतत्परतेणे प्रतिसाद देत होता.त्यामुळे आमच्या मनात सुरक्षिततेची भावना जागृत झाली.
कणकवलीत सर्वात जास्त चाचण्या झाल्या. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णही जास्त मिळाले आहेत. महामार्गा लगत असलेली कणकवली ही बाजारपेठ आहे.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत होता.अशी सर्व परिस्थिती असतांनाही डॉक्टर आणि आरोग्ययंत्रणेने जे आव्हान पेलले हे अभिमानास्पद आहे.कणकवली तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला सर्वात जास्त त्रास सरकारी यंत्रणेने दिला.प्रशासनाने कसलीच ताकद दिली नाही.जर सरकार नावाची चीज असती तर आज खूप सोयी सुविधा मिळाल्या असत्या. जिल्हा नियोजन मधील २३ कोटी आज कोरोनावर खर्च करण्यासाठी ठेवले आहेत.ते शोभेच्या वस्तू ठेवण्याच्या कपाटात आहेत काय ? तो निधी जर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतन, बोनससाठी वापरला असता तर यंत्रणेत आणखीनच आत्मविश्वास वाढला असता. प्लाझ्मा थेरपीची मागणी मी सातत्याने केली .
दोन वेळा जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला.मात्र या प्लाझ्मा थेरपीचे उदघाटन रत्नागिरीत होत आहे.म्हणजे मागणी आमची आणि फायदा पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात घेतला असल्याचा आरोप नितेश राणे यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमात तुमच्या खांद्यावर फक्त शाल टाकणार नाही. तर तुमचे ऋण कायम ठेवेन. लोकप्रतिनिधी म्हणून तुमची सेवा करेन. तुमच्या कुटुंबाला ताकद देईन . असेही आमदार राणे म्हणाले.यावेळी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर व १०८ रुग्णवाहिका चालकांचे सत्कार आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.