देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी असून, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. याबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. घडलेल्या घटनेसाठी समिती नेमून चौकशी करून अहवाल मागविला जाईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दीपक केसरकर रविवारी देवगड दौऱ्यावर आले होते. त्यांनी मृत संदीप कावले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघा रुग्णांची विचारपूस केली. देवगड ग्रामीण रुग्णालयात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, संजय पडते, आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. भगत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले की, झालेली घटना ही दुर्दैवी असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. कावले कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रुग्णालयातील सोयी-सुविधा, अपुरी कर्मचारी संख्या, रुग्णांच्या गरजा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने याबाबत चर्चा केली. येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याबाबत चर्चा केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालय म्हणून याला प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी तांत्रिक मान्यता व निधीची तरतूद झाली नसल्याचे डॉ. बिलोलीकर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)इंजेक्शने तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविणारसिंंधुदुर्ग जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या साहाय्यक आयुक्त पी. एस. अय्यर यांनी रविवारी रुग्णालयात भेट देऊन तपासणी केली. कालावधी कमी असल्याने संबंधित बॅचची इंजक्शने तपासणीसाठी बांद्रा मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘त्या’ घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार
By admin | Published: December 28, 2015 12:14 AM