बांदा : लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या बागायतींचे रानटी प्राण्यांकडून नुकसान होत असल्याने पाडलोस-केणीवाडा येथील शेतकरी, बागायतदार मेटाकुटीस आले आहेत.
प्रेमानंद साळगावकर यांच्या बागेतील नारळ, सुपारी, काजू, जांभूळ व दालचिनी झाडे गव्यांनी जमीनदोस्त केली असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गव्यांच्या लागलेल्या झुंजीमुळे झाडांची हानी झाल्याचे कामगार सुनील नाईक यांनी सांगितले.पाडलोस परिसरात गव्यांचा वावर नेहमीच असतो. गव्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वनविभागाला लागणारी कागदपत्रे महसूलकडून वेळेवर मिळत नाहीत. तसेच सावंतवाडीला खेपा माराव्या लागत असल्याने शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे केवळ पंचनामा न करता अशा उपद्रवी प्राण्यांचा प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करून करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.सद्यस्थितीत पाडलोसमधील शेकडो एकर जमीन गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे पडीक ठेवण्यात आली आहे. सध्या काजूचा हंगाम असल्याने शेतकरी दिवसभर बागेत वावरत असतात. दोन गव्यांची अचानक झुंज लागली होती. परंतु कुत्रे त्यांच्या अंगावर धावत गेल्याने गव्यांनी तेथून धूम ठोकली. मात्र, या गव्यांनी उत्पन्न देणारी नारळाची चार वर्षांची दोन झाडे, दहा सुपारी झाडे, काजूची २५ तर जांभूळ कलम सहा आणि मसाल्यासाठी वापरण्यात येणारे एक दालचिनी झाड यांची मोडतोड केली.बिबट्याकडून कुत्र्याची पिल्ले फस्तदोन दिवसांपूर्वी एका बिबट्याने याच बागेत असणाऱ्या कुत्र्याच्या तीन लहान पिल्लांना पहाटे ४ वाजताच्या सुमारास फस्त केले. कामगार दुंडप्पा कांबळी यांनी विजेरीच्या सहाय्याने बिबट्याला हुसकावून लावले. त्यामुळे येथील नागरिकांच्या जीवास अशा वन्य प्राण्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन मानवी जीवाला धोका निर्माण करणाऱ्या व वस्तीत घुसणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.