दवाखाना वाऱ्यावर ; अधिकारी रजेवर
By admin | Published: December 27, 2015 10:21 PM2015-12-27T22:21:15+5:302015-12-28T00:48:13+5:30
उंबर्डे येथील प्रकार : डॉक्टर नसल्याने रुग्ण उपचारांविना परतले माघारी
प्रकाश काळे -- वैभववाडी -दिवशी पन्नास-साठ रुग्णसंख्या असलेले उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र शनिवारी वाऱ्यावर सोडून आरोग्य अधिकारी बिनबोभाट सुट्टीवर गेल्यामुळे रुग्णांना उपचारांविना माघारी परतावे लागले. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा सावळागोंधळ उघड झाला. या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी टोलवाटोलवी करीत हात झटकण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन रुग्णांच्या जीवाशी खेळून केलेली ‘अॅडजेस्टमेंट’ उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकाराची लोकप्रतिनिधी व प्रशासन दखल घेणार की सोयीप्रमाणे पांघरून घालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुरुवारी ईद-ए-मिलाद व शुक्रवारी ख्रिसमसच्या सुट्टीमुळे सलग दोन दिवस आरोग्य केंद्र बंद होते. उंबर्डे आरोग्य केंद्राच्या अधिनस्त तब्बल १८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे शनिवारी पंचक्रोशीतील रुग्ण उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात येत होते. परंतु आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचे सांगून तेथील कर्मचारी रुग्णांना माघारी पाठवत होते. त्यामुळे शनिवारी सर्व रुग्ण उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र्रातून उपचारांविना माघारी परतले. सलग दोन दिवसांच शासकीय सुट्टी असल्याने उंबर्डे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महानूर शनिवारी रजा टाकून गावी गेले होते. मात्र, डॉ. महानूर यांची रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याने उंबर्डे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचा अजिबात विचार केलेला दिसत नाही.
विशेष म्हणजे डॉ. महानूर यांच्याकडेच तालुका आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार आहे. तरीही उंबर्डेचे वैद्यकीय अधिकारी म्हणून स्वत: रजेवर जाताना आपण तालुका आरोग्य अधिकारी आहोत. त्यामुळे आपल्या जागी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी आपलीच आहे. याचा मात्र डॉ. महानूर यांना विसर पडला. त्याहून गंभीर बाब म्हणजे ज्यांनी डॉ. महानूर यांची रजा मंजूर केली त्यांनाही दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार असलेल्या उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली डॉक्टर देण्याचे भान राहिले नाही. त्यामुळेच उंबर्डे आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना उपचारांविना घरी परतावे लागले.
डॉक्टरअभावी शनिवारी उंबर्डे आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड झाल्याचे समजताच जिल्हा आरोग्य अधिकारी साळे व डॉ. महानूर यांच्याशी संपर्क साधला असता उंबर्डेत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कांबळे यांना लक्ष द्या असे तोंडी सांगून शनिवारी कोणाचीही रितसर नियुक्ती केली नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून उघड झाले. मुळात उंबर्डे वैभववाडी हे अंतर नऊ किमी असताना एकाच वेळी डॉ. कांबळे दोन्ही ठिकाणी ‘ओपीडी’ कशी अॅडजेस्ट करु शकतील याचा विचारही आरोग्य अधिकाऱ्यानी केलेला दिसत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे जिल्ह्यात आरोग्य खात्याची दैनावस्था असताना रुग्णांच्या जीवाशी खेळत उंबर्डे आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून आरोग्य अधिकाऱ्यांनी अॅडजेस्टमेंट केल्याचे उघड झाले आहे. परंतु या प्रकाराची कोण दखल घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवनाथ कांबळे यांना सांगितले होते : योगेश साळे
उंबर्डे आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याशी संपर्क साधला असता, डॉ. महानूर रजेवर गेल्याने डॉ. नवनाथ कांबळे यांना उंबर्डेत लक्ष द्यायला आपण सांगितले होते. ते सध्या ग्रामीण रुग्णालयाकडे कार्यरत असले तरी त्यांची मुळ आस्थापना आमच्याकडेच आहे. त्यामुळे नेमके काय झाले ते पहावे लागेल असे सांगून डॉ. साळे यांनी टोलवाटोलवी केली.
मी रजेवर होतो : महानूर ; माझा संबंध नाही : कांबळे
सलग दोन दिवस सुट्टी असल्याने मी जोडून शनिवारी रितसर रजा टाकून गावी गेलो. त्यामुळे शनिवारी डॉ. नवनाथ कांबळे यांना लक्ष द्यायला सांगितले होते. आम्ही एकमेकांना अॅडजेस्ट करतो. हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना माहीत आहे, असे डॉ. महानूर यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी साळे, डॉ. महानूर यांच्या खुलाशाबाबत डॉ. नवनाथ कांबळे यांना विचारले असता ते म्हणाले, आरोग्य उपसंचालकांच्या आदेशान्वये माझी नियुक्ती वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाकडे झालेली आहे. त्यामुळे मी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ‘ओपीडी’ पाहत होतो. शिवाय मला कोणही उंबर्डेकडे लक्ष द्यायला सांगितलेले नाही. असे स्पष्ट करीत डॉ. साळे व डॉ. महानूर यांचा कांगावा डॉ. कांबळे यांनी उघड केला आहे.