सावंतवाडी : येथे मंजूर करण्यात आलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अन्यत्र हलविण्याच्या हालचाली शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरू असताना, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी मात्र हे रुग्णालय शहरातच उभारण्यात येणार आहे, असे सांगितले. तसेच राजघराण्याशी बोलून जागेचा वाद सोडविण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.केसरकर म्हणाले, सर्वांना सोयीची होईल अशी जागा याठिकाणी शोधण्यात आली होती. त्यामुळे जागेचा तिढा सोडविण्यासाठी मी लक्ष घालणार आहे. राजघराण्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे कोणी एकमेकांवर टीका टिप्पणी करून आपापसात रोष ओढवून घेऊ नये.
पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी या रुग्णालयासाठी वेत्ये येथील जागा अंतिम करा, अशा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता हे रुग्णालय अन्य ठिकाणी हलविण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे.
या वादात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह विद्यमान नगराध्यक्ष संजू परब, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा अन्य व्यावसायिकांनी उडी घेतली असून काही झाले, तरी आम्ही हे रुग्णालय अन्यत्र न्यायला देणार नाही, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर केली. माझ्या मतदार संघातील वेत्ये गावाकडे दुर्लक्ष होणार नाही. याचीही मी खबरदारी घेणार आहे, असेही केसरकर म्हणाले.
हे रुग्णालय मी मंत्री असताना सावंतवाडी शहरासाठीच जाहीर केले होते. त्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यामुळे ते सावंतवाडी शहरातच करण्यात येणार आहे. त्यासाठी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी मी राजघराण्याशी चर्चा करणार आहे. येत्या आठ दिवसांत मी मतदारसंघात येणार असून पुढील प्रक्रिया पूर्ण करणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या ते नाकारता येणार नाही.- दीपक केसरकर, आमदार, सावंतवाडी मतदारसंघ