सावंतवाडी : तालुक्यातील निगुडे गावातील घरांना सुरूंग स्फोटांनी तडे जाऊन झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. गावातून ओव्हरलोड खनिज मालाच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
नादुरुस्त झालेल्या या रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा २६ जानेवारी रोजी आंदोलन छेडण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन निगुडे सरपंच समीर गावडे व उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे दिले आहे.निगुडे, सोनुर्ली, वेत्ये व इन्सुली या गावातील असणाऱ्या काळ्या दगडाच्या खाणींच्या सुरूंग स्फोटांमुळे निगुडे ग्रामपंचायत हद्दीतील १५६ घरांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामा नुकसानीनुसार २१ लाखांचा नुकसानीचा आकडा आहे. ही नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी व संबंधित क्वारी मालकांवर कारवाई होण्यासाठी उपोषणही केले होते.त्यावेळी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. उलट कारवाई न करता खाणीत सुरूंग लावून ब्लास्टिंग सुरू आहे. नवीन खाणींना परवानगीही देण्यात आली आहे. निगुडेतील समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने अखेर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.