पाण्यासाठी शंभर वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 09:28 PM2016-06-16T21:28:58+5:302016-06-17T00:45:43+5:30
राजन साळवींचे प्रयत्न : खरवते-धनगरवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली
वाटूळ : मुंबई - गोवा महामार्गालगत डोंगरमाथ्यावर वसलेल्या खरवते - धनगरवाडीची पिण्याच्या पाण्याची शंभर वर्षांपासून कायम असलेली समस्या अखेर सुटली आहे. आमदार राजन साळवींच्या प्रयत्नांमुळे खरवते - धनगरवाडीत १५ जून रोजी नळपाणी योजना प्रत्यक्ष सुरु झाली आहे.
मागील शंभर वर्षांपासून वाडीतील लोकांना डोंगर उतरून जंगलामध्ये असलेल्या नाल्याजवळून पाणी आणावे लागत होते. त्यासाठी पायपीट करावी लागत होती. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना दररोज डोंगर उतरुन जंगलात यावे लागे. श्वापदांची भीती उराशी बाळगत पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष खरवतेतील धनगरवाडीला नित्याचा झाला होता. ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना मदतीचा हात देऊ केला.
राजापूरचे आमदार साळवी यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत वाडीसाठी विहीर व नळपाणी योजना राबवण्याचे अभिवचन दिले होते. या वचनाची पूर्तता झाली असून, १५ जून रोजी विहिरीतील पाणी नळयोजनेच्या सहाय्याने धनगरवाडीमध्ये पोहोचले असून, शंभर वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. सदर योजनेच्या पाठपुराव्यासाठी धनगर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश झोरे, जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे, सरपंच आग्रे, शेखर कुलकर्णी आदींनी मेहनत घेतली. जिल्हा धनगर समाज संघटनेकडून आमदार साळवी, तहसीलदार भालेकर, प्रांताधिकारी यांचे आभार मानले आहेत. (वार्ताहर)
वणवण थांबली : ग्रामीण भागात पायपीट
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खरवते येथील लोकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबण्यासाठी १०० वर्षांची वाट पाहावी लागली.
योजना राबवा...
पाण्याची समस्या सोडवण्यासाठी योजना राबवण्यात येते. थोड्याच दिवसात ती बंद पडते. त्यामुळे कोणतीही योजना सक्षमपणे राबवणे गरजेचे आहे.