शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी संघटनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:26 AM2019-08-29T11:26:30+5:302019-08-29T11:28:20+5:30
ओरोस : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकींच्या मानधनात शासनाने जून महिन्यापासून ५०० रुपयांची वाढ केली आहे. मात्र, हे मानधन ...
ओरोस : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकींच्या मानधनात शासनाने जून महिन्यापासून ५०० रुपयांची वाढ केली आहे. मात्र, हे मानधन हातात येण्यापूर्वीच डिगस हायस्कूल, आंब्रड हायस्कूल व जिल्हा परिषद आजगाव शाळेने चक्क स्वयंपाकी कामगार महिलांना कामावरून कमी केले. या कामगारांना न्याय मिळावा म्हणून सोमवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाच्यावतीने उपोषण सुरू करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने स्वयंपाकी कामगारांची नेमणूक करावयाची आहे. मात्र, त्यांना कामावरून केव्हा कमी करता येईल याचे काही नियम शासनाने तयार केले आहेत. १० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार स्वयंपाकी नियुक्त करीत असताना गावातील परित्यक्ता, विधवा, गरजू गरीब महिलांना निवडावे तसेच मागासवर्गीयांनाही प्राधान्य द्यावे असे आदेश आहेत.
जिल्हा परिषद आजगाव प्राथमिक शाळेत स्वयंपाकी महिलांना कामावरून काढून त्याठिकाणी पुरुष कामगारांना ठेवण्यात आले आहे. सलग तीन दिवस आहारात खंड पडल्यास किंवा महिन्यातून पाच दिवस खंड पाडणाऱ्यांना कामावरून काढून टाकता येईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
स्वयंपाकींंना सरसकट कमी केले जाऊ नये असेही या निर्णयात म्हटले आहे. असे असतानाही काही शाळा व्यवस्थापन समित्या मनमानी करीत केव्हाही स्वयंपाकी कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेताना दिसतात. आजगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी लेखी लिहून दिले आहे की दरवर्षी स्वयंपाकी बदलण्यात यावा. त्यामुळे अशा मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी यांनी शासनादेश तसेच निर्णयाची माहिती द्यावी.
संघटनेची तक्रार, संस्थेचा खुलासा यातून शिक्षणाधिकारी यांनी योग्य बाजू तपासून घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. असे असतानाही शाळा व्यवस्थापनकडून महिला स्वयंपाकींना अन्यायकारकरित्या कामावरून काढले जाते. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा यासाठी संघटनेच्या अक्षता मेस्त्री, सुप्रिया तेली, श्रद्धा दळवी या स्वयंपाकींसह संघटनेच्या अध्यक्षा कमल परुळेकर, उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत आदींसह १० ते १५ महिला उपोषणास बसल्या आहेत.
रणजित देसाई यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण सभापती अनिशा दळवी, प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी उपोषणस्थळी भेट देत शिक्षणाधिकारी आल्यावर आपण यावर तोडगा काढू असे आश्वासित केल्यानंतर स्वयंपाकींचे हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचेही संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.