दोडामार्ग : तिलारी घाटात झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन तब्बल दोन ठिकाणी डोंगर कोसळला. या दोन्ही ठिकाणच्या दरडींमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार तुळशीदास नाईक व विजघर येथे वीजनिर्मिती केंद्रावर कामासाठी जाणारे कामगार अडकून पडले. याबाबतची माहिती दोडामार्ग व कोल्हापूर या दोन्ही ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आली. तरीही सायंकाळी उशिरापर्यंत आपत्ती यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती. अखेर ग्रामस्थांनी सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने घाटात अडकलेल्यांना बाहेर काढले.या ढगफुटीचा फटका तिलारी खोऱ्यातील गावांनाही बसला. हेवाळे गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले.तिलारी घाट परिसरात शुक्रवारी ढगफुटी झाली. त्यामुळे तिलारी घाट व परिसराला त्याचा चांगलाच फटका बसला. तिलारी घाटात भूस्खलन होऊन डोंगरच रस्त्यावर येण्याचा प्रकार घडला. याबाबतची माहिती पत्रकार तुळशीदास नाईक यांना समजताच ते तिलारी घाटात वृत्तांकन करण्यासाठी दाखल झाले. याच दरम्यान तिलारीनगर येथून विजघर येथील वीजनिर्मिती केंद्रावर येणारे कामगार रमेश घाडी व प्रकाश पाटील हे देखील घाटात आले. मात्र, दरड कोसळल्याने ते घाटात अडकले.परतीचा प्रवास करावा म्हणून घाटात अडकलेले तिघेही मागे फिरले असता आणखीनच एक दरड परतीच्या मार्गावर कोसळली. यावेळी ही दरड कोसळताना तिघेही केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले. येण्या-जाण्याचे दोन्ही मार्ग बंद झाल्याने हे तिघेही घाटातच अडकून पडले. याबाबतची माहिती त्यांनी दोडामार्ग तहसील व कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी पोहोचले नव्हते.
अखेर सात तासांच्या संघर्षानंतर लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने अडकलेल्या तिघांसह दोन दुचाकी ग्रामस्थांनी बाहेर काढल्या. गेल्या महिनाभरात तिलारी घाट कोसळण्याची ही दुसरी घटना घडली. महिनाभरापूर्वी घाट कोसळला होता. त्यानंतर भूस्खलन होऊन पुन्हा एकदा डोंगर खचून रस्त्यावर येण्याची घटना शुक्रवारी घडली.आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरादोडामार्ग तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाला याबाबतची माहिती शुक्रवारी सकाळीच देण्यात आली. मात्र, तेथील एकाही अधिकाºयाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती विभागानेही याकडे दुर्लक्ष केले. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी उशिरापर्यंत दोडामार्गचा आपत्ती विभाग जेसीबीचा शोध घेत होता. तिलारी खोऱ्याला पुराचा वेढातिलारी घाट व परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे तिलारी खोऱ्याला पुराचा वेढा पडला. तिलारी नदी, मूळस-हेवाळे नदी, तसेच इतर नद्यानाल्यांना पूर आला. त्यामुळे त्याचा फटका हेवाळे, घोटगेवाडी, विजघर आदी गावांना बसला. पुराच्या पाण्याने या गावांना वेढा दिला. तसेच बागायतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.