दुचाकी अपघातात पती, पत्नी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:39 AM2019-08-27T11:39:14+5:302019-08-27T11:41:37+5:30
कांदळगाव येथील रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात पती व पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालवण : कांदळगाव येथील रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात पती व पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कांदळगाव येथील नंदकिशोर राणे हे पत्नी रिया राणे, मुलगी दुर्वा, मुलगा दुर्वेश यांना घेऊन दुचाकीने कांदळगावहून मालवण येथे येत होते तर कांदळगाव येथील लवेश आयकर हा दुचाकीने कांदळगाव येथे जात होता.
अनंताश्रमलगतच्या रस्त्यावर या दोन्ही दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक बसली. यात नंदकिशोर व त्यांची पत्नी रिया रस्त्यावर फेकले गेले. यात नंदकिशोर यांच्या पायास तर पत्नी रिया यांच्या चेहऱ्यास गंभीर दुखापती झाल्या. सुदैवाने त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच तेथून येणाऱ्या कांदळगावचे माजी सरपंच रणजित परब यांनी संदीप परब, रुपेश लाड, सविता पाटकर, योगेश लाड, राकेश लाड, बाबू बागवे यांच्या मदतीने कारमधून त्यांना तत्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात झालेली नाही.