सावंतवाडी : शिवसेना मला मंत्रिपद मिळू नये म्हणून आटापिटा करीत आहे; पण माझे मंत्रिपद कोणीही रोखू शकत नाही आणि मंत्री केसरकर तर चिपाट आहे. ते माझे मंत्रिपद काय रोखणार? संपूर्ण महाराष्ट्र मला डोक्यावर घेत असतानाच सिंधुदुर्गमधूनच फक्त काहीजण मला विरोध करीत आहेत; पण या विरोधामुळे माझे मंत्रिपद रोखण्याची कोणातही हिंमत नाही, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिले. ‘विकास दाखवा आणि एक लाख कमवा’ असे म्हणत राणे यांनी मंत्री केसरकर यांची खिल्ली उडविली.
सावंतवाडीतील आदिनारायण मंगल कार्यालयात शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब,सभापती रवी मडगावकर, नगरसेवक राजू बेग, दोडामार्ग नगराध्यक्ष संतोष नानचे, महिला तालुकाध्यक्षा गीता परब, संदीप कुडतरकर, आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, दीपक केसरकर हे सिंधुदुर्गसाठी कलंंक आहेत. त्यामुळे हा कलंक येत्या विधानसभा निवडणुकीत पुसला पाहिजे. यासाठी सर्वांनी कामाला लागा. ज्या पद्धतीने प्रत्येक निवडणुकीत यश संपादन केले, तसेच यश विधानसभा निवडणुकीत आपल्याला हवे आहे.अनेक वेळा मंत्री केसरकर यांना सहकाºयांचा रोष पत्करून मदत केली; पण हा कृतघ्न माणूस आहे. त्यांची अनेक प्रकरणे माझ्याकडे आहेत. आगामी काळात ती बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.जिल्ह्यातील सर्व प्रकल्प ठप्प आहेत. गेल्या तीन वर्षांत निधीची घोषणा झाली; पण विकास कुठेच दिसला नाही. त्यामुळे यापुढे खोट्या घोषणा दिल्या तर त्यांना सोडू नका, लोकशाही मार्गाने आंदोलने करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत मंत्री केसरकरांचा विकास दाखवा आणि एक लाख कमवा, असा नाराही त्यांनी यावेळी दिला.जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघातील सर्व निवडणुका स्वाभिमान पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे आता मंत्री केसरकर हे टीकेपुरते आहेत. त्यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, मंत्री केसरकरांना आता स्वत:च्या पराभवाचा ईश्वरी साक्षात्कार झाला आहे. प्रत्येक वेळी मांत्रिकाच्या नावावर निवडून येऊन दुसºयाला ईश्वराचे संकेत असल्याचे सांगायचे. उलट यांच्याच मतदारसंघात येऊन पोलीस खून करून मृतदेह टाकत आहेत. म्हणजे यांचा दराराच शिल्लक राहिला नाही.तालुकाध्यक्ष संजू परब यांनी प्रास्ताविक केले. सातार्डा जिल्हा परिषदेच्या सदस्या शर्वणी गावकर व शेखर गावकर यांचा राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुदन बांदिवडेकर, संदीप कुडतरकर, आदींची भाषणे झाली.संजू परब यांना कामाला लागण्याचे संकेततालुकाध्यक्ष संजू परब यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढे यावे. माझी पूर्ण साथ राहील. कधीही हाक मारा, धावून येईन, असा धीर राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच संजू परब आता कामाला लागा, असे सांगत विधानसभा लढविण्याचे संकेत दिले....तर केसरकरांची जीभ झडेलमाझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी सुरू केली आहे; पण मी गप्प बसणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला. मंत्री केसरकर माझी मदत घेण्यासाठी प्रत्येकवेळी येत होते. २००९ मध्ये तर विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी माझे पाय धरले होते; पण आता माझ्यावरच गुन्हेगारीचे आरोप करत आहेत. त्यांनी ते सिद्ध तरी करून दाखवावेत, असे सांगत देव कुठे असेल तर केसरकरांची जीभ झडेल, अशी टीकाही राणे यांनी केली.