कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे.प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी कणकवली बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
याच दिवशी सकाळी 9 वाजता काळ्या फिती बांधून कणकवली शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्तांच्यावतीने उदय वरवडेकर यांनी दिली.येथील हॉटेलमध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विशाल कामत, महेश नार्वेकर, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे, विलास कोरगावकर, अनिल शेट्ये, शिशिर परुळेकर, संजय मालंडकर, चानी जाधव, नितिन पटेल, रत्नाकर देसाई ,रामदास मांजरेकर, चंदू कांबळी, संजय मालंडकर, बाळा बांदेकर,महाडिक, वाळके आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रकल्पग्रस्तानी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करताना विस्थापित होणारे व्यापारी आणि भाडेकरूंवर अन्याय होत आहे.शासनाने प्रकल्पग्रस्तांना नगण्य मूल्य देवू केले आहे. त्यामुळे हे सर्वजण उद्ध्वस्त होणार आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बाधित होणाऱ्या अनेकांची प्रशासनाने दखलच घेतलेली नाही. तसेच त्याना नोटीसाहि काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ते लवादाकडे हरकतही घेवू शकत नाहीत.याउलट ज्याना नोटिसा आलेल्या आहेत. त्यानी हरकती सादर करूनही त्याना अद्याप प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. शासकीय यंत्रणेने चुकीच्या पध्दतीने जागा, इमारत तसेच मालमत्ता यांचे मूल्यांकन केले आहे. मात्र, त्याचा फटका प्रकल्पग्रस्तांना बसत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे आणि लवकरच त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन तसेच शासनाने याची दखल घ्यावी आणि स्टॉल धारक तसेच विस्थापित होणाऱ्यांचे योग्य पुनर्वसन करावे अशी आपली मागणी असल्याचे प्रकल्पबाधितानी यावेळी सांगितले.गुरुवारी होणाऱ्या कणकवली बंद आंदोलनाला विविध राजकीय पक्ष तसेच संघटनानी पाठिंबा दिला आहे. यामध्ये व्यापारी महासंघ, रिक्षा संघटना, स्टॉल संघटना, बेकरी संघटना, हॉटेल मालक संघटना, कणकवली तालुका मुस्लिम संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, विदेशी मद्य विक्रेते संघटना, जिल्हा फुटवेअर असोसिएशन, रोटरी क्लब , सुवर्णकार संघटना ,टेम्पो चालक -मालक संघटना अशा विविध संघटनांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनीही या बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.तसेच सर्वच राजकीय पक्ष प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. त्यांनी यापुढे आणखिन जोमाने प्रयत्न करून प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यश मिळवून द्यावे. असे आवहनही यावेळी करण्यात आले.प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन !महामार्ग चौपदरीकरणासाठी भुसंपादन करताना चुकीची प्रक्रिया राबविणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी कणकवली बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. परमहंस भालचंद्र महाराज आश्रम परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिराकडून पटकीदेवी मंदिर ते बाजारपेठ मार्गे पू.अप्पासाहेब पटवर्धन चौकातून प्रांताधिकारी कार्यालया पर्यन्त मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
कणकवलीकराना गृहीत धरून जर प्रशासनाने या लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच कणकवलीत महामार्गाचे काम कुठल्याही परिस्थितीत करु दिले जाणार नाही .यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितिचि जबाबदारी पूर्णतः प्रशासन व शासनाचीच राहील असा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्तांकडून देण्यात आला.