बांदा : बांदा पोलिसांनी शुक्रवारी दोन वेगवेगळ्या कारवाईत दारूसह मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी रात्री उशिरा बांदा सटमटवाडी नाका येथे गोवा बनावटीच्या दारूसह ५० लाख ८८ हजार ३७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अत्यावश्यक सेवेच्या परवान्याचा गैरवापर करून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशा वाहनांतून गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न होत असल्याने बांदा तपासणी नाक्यावर बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वाहनांची कसून तपासणी सुरू केली जात आहे. यामुळे चोरटी दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.दुसऱ्या कारवाईत ७६ हजार ३७४ रुपयांची दारू व २० लाख रुपयांचा ट्रक असा एकूण २० लाख ७६ हजार ३७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सागर चंद्रकांत कदम (२५, चिंचोली-सातारा) व विजय पंढरीनाथ बरगे (३१, रा. कोरेगाव, सातारा) यांना अटक केली. या कारवाईत २० लाख रुपयांचा ट्रक (एम. एच. ११, ए. एल. ४३३६) जप्त करण्यात आला.ही कारवाई शुक्रवारी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास चेकपोस्टवर करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत देसाई, डी. डी. मिठबांवकर, डी. जी. गोळे यांच्या पथकाने केली. गोव्यात बार बंद असतानाही अत्यावश्यक सेवा परवाना वाहनधारकांना दारू कशी उपलब्ध होते असा सवाल होत आहे.दारू वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखलपहिल्या कारवाईत बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी केशव बबन मोरे (२६, रा. शिरूरकासार, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला. तो टँकरमधून (एम. एच. १०, सी. आर. ५१६१) १२ हजार रुपयांची दारू वाहतूक करीत होता. या कारवाईत एकूण ३० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबतची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गोळे यांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, डी. डी. मिठबांवकर, एच. एन. देसाई, धनंजय गोळे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री केली.