कणकवली : देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून देवगड येथील आनंदवाडी जेटी प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी ९६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मच्छिमारांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध करून देणारा आनंदवाडी प्रकल्प त्वरित मंजूर करून त्यासाठी आर्थिक तरतूद करून तो पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी कणकवली मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.आमदार राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. देवगड आनंदवाडी जेटी प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा केली. मस्त्यव्यवसाय विभागाकडून प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ९६ कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता. त्यामुळे या प्रकल्पाला जेवढा विलंब होईल तेवढा खर्च अधिक वाढत जाईल. याचा विचार करता मच्छिमारांच्या सोयीसाठी प्रकल्प तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्पाला जमीनधारक किंवा मच्छिमारांचा विरोध नाही. येथील जनतेचीही प्रकल्प व्हावा, अशी मागणी आहे. जनतेच्या अपेक्षा, मत्स्य व्यावसायिकांसाठी मच्छी चढ-उतार करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या प्रकल्पाला सरकारने निधी उपलब्ध करून तो पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
आनंदवाडी जेटीला तातडीने मंजुरी द्या
By admin | Published: May 13, 2015 9:51 PM