खारेपाटण येथे घनकचरा प्रकल्पाचा प्रारंभ,५०० रुपये दंड आकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:40 AM2021-03-02T10:40:55+5:302021-03-02T10:43:46+5:30
Garbage Disposal Issue sindhudurg-खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रारंभ खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
खारेपाटण : खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रारंभ खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
यावेळी उपसरपंच इस्माईल मुकादम, सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर, संकेत शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, शंकर राऊत, अंजली कुबल, रिना ब्रम्हदंडे, ग्रामविकास अधिकारी जी. एस. वेंगुर्लेकर, निलेश गुरव आदी उपस्थित होते.
यापुढे सार्वजनिक ठिकाणी गावात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून, अशी व्यक्ती आढळल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सूचना फलक खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने गावात लावण्यात आले आहेत.
खारेपाटण मासळी मार्केट इमारतीच्या पाठीमागील भूखंडात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी एकूण ४ मोठ्या चिरेबंदी पक्क्या बांधकामाच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत.
यामध्ये कुजलेली भाजी व फळे, भाज्यांची पाने, देठ, लिंबू व फळांचा चोथा, शिल्लक अन्न, अंड्यांची कवचे, चिकनचा टाकाऊ भाग, कुजलेली फुले, निर्माल्य, नारळाची सोडणे, शिल्लक नाशवंत टाकाऊ मासे आदी घाण कचरा व वस्तू या टाक्यांमध्ये टाकण्यात येणार असून, ओला कचरा व सुका कचरा याकरिता वेगवेगळ्या स्वतंत्र टाक्या बांधण्यात आल्या आहेत.
एक पाऊल स्वच्छतेकडे
खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने एक पाऊल स्वच्छतेकडे या उपक्रमाअंतर्गत गावातील कचरा आता एकाच ठिकाणी संकलित करण्यात येणार आहे. १५ व्या वित्त आयोगातून सुमारे ६० हजार रुपये खर्च करून हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे.
गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व खारेपाटण शहरात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास याद्वारे सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी दिली.