Sindhudurg: भैय्या कामगारांच्या गुन्हेगारी उपद्रवाला आळा घाला!, ग्रामस्थांकडून मागणी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 30, 2024 06:07 PM2024-03-30T18:07:15+5:302024-03-30T18:07:34+5:30
महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना : ग्रामस्थांचे दुर्लक्ष, ग्रामस्थांच्याच अंगलट
सिद्धेश आचरेकर
आचरा : तोंडवळी खाडीकिनारी वास्तव्यास असलेल्या भैय्या वाळू कामगारांची गुन्हेगारी वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोट भरण्याच्या उद्देशाने गावात आलेल्या या परप्रांतीयांच्या काही हरकतींकडे ग्रामस्थांकडून दुर्लक्ष केला गेला. मात्र कामगारांच्या वाढलेल्या मुजोरीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती गावात बोकाळली आहे. त्यामुळे भैय्यांच्या उपद्रवाला लगाम घालण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
तोंडवळी गावात वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीयांची गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागल्यामुळे महिनाभरापूर्वी ग्रामस्थांनी तातडीने गाव बैठकही घेतली होती. यात धक्कादायक म्हणजे मुक्या प्राण्यांवर अत्याचार करण्याएवढे धाडस कामगारांनी केल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर गाव परिसरात राहणाऱ्या सर्व परप्रांतीय कामगार तसेच व्यक्तींची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी ठेवताना पोलिस ठाण्यात माहिती देण्यात येईल, अशी भूमिका ग्रामपंचायत प्रशासनाने घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कामगारांची गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे. यापुढे परप्रांतीयांची मुजोरी वाढली तर त्याला ग्रामस्थ शासन देतील, अशी भूमिका महिलांची आहे. परप्रांतीय कामगारांची नोंद पोलिस ठाण्यात करणे हे संबंधित व्यावसायिकांची जबाबदारी आहे.
असुरक्षित वाटल्यास डायल ११२ संपर्क साधा
कामगारांची गुन्हेगारी वृत्ती वाढली असेल किंवा महिलांना असुरक्षित वाटत असेल तर पोलिस प्रशासनाच्या डायल ११२ या क्रमांकांवर महिलांनी संपर्क साधल्यास पोलिस कर्मचारी त्याची तत्काळ दखल घेत अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी येऊन तपास काम करू शकतील. डायल ११२ ही मोहीम प्रभावी असून पोलिसांकडून यात कोणताही हलगर्जीपणा केला जात नाही.
कामगारांचे ते प्रकार रोखा!
वाळू व्यावसायिकांनी कामगारांना योग्य समज देणे आवश्यक बनले आहे. मुक्या प्राण्यांवर अत्याचार होणे ही लाजिरवाणी बाब असून महिला भगिणींनाही आक्षेपार्ह हावभाव करून दाखवल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत, अशीही ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. परप्रांतीय कामगारांचे हे प्रकार रोखले न गेल्यास गावकरी स्वस्थ बसणार नाहीत, एवढं मात्र निश्चित.