काँग्रेसच्या तिन्ही मतदार संघांतील इच्छुकांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 05:30 PM2019-08-02T17:30:32+5:302019-08-02T17:32:39+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून उमेदवारांच्या नावाचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश कमिटीला पाठविला जाणार असल्याची माहिती पक्षनिरीक्षक गुलाबराव घोरपडे यांनी सावंतवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवराज मोरे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी आमदार सुभाष चव्हाण, विकास सावंत, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.
सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून उमेदवारांच्या नावाचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश कमिटीला पाठविला जाणार असल्याची माहिती पक्षनिरीक्षक गुलाबराव घोरपडे यांनी सावंतवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवराज मोरे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी आमदार सुभाष चव्हाण, विकास सावंत, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्यावतीने २८ ते ३१ जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात २८८ मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अॅड. दिलीप नार्वेकर, विलास गावडे, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे तर कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार पुष्पसेन सावंत, काका कुडाळकर, अरविंद मोडेकर तर कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण उपरकर यांनी मुलाखती दिल्या असून त्यांच्या उमेदवारीबाबत प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे पाठविणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला महाआघाडीत घेण्याचा कोणताच प्रस्ताव आलेला नाही, तशी चर्चादेखील नाही. नारायण राणेंना महाआघाडीत घेण्याचे सर्वाधिकार हायकमांडकडे आहेत, असे सुतोवाचदेखील त्यांनी केले. तर नीतेश राणेंनी काँग्रेसकडून निवडणूक लढविल्यास जिल्हा काँग्रेस त्यांचा प्रचार करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना नीतेश राणे जरी काँग्रेसचे विद्यमान आमदार असले तरी असा कोणताच प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग काँग्रेसची सर्व जबाबदारी गावडे यांच्यावर
आघाडीबाबत आम्ही आशावादी आहोत. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असून आघाडीबाबतचा निर्णय महाराष्ट्र काँग्रेस कमिटी घेईल. तर आघाडी झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसला सोडण्यात यावेत, असा प्रस्ताव महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला पाठविण्यात येणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख विकास सावंत यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर विलास गावडे यांची सिंधदुर्ग काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली असून विकास सावंत यांच्या राजीनाम्यानंतर सिंधुदुर्ग काँग्रेसची सर्व जबाबदारी कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.