मालवण : भारतात मी याआधी पाचवेळा आलो आहे. मात्र माझे आजोबा, वडील राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. माझे आडनाव या गावाशी जोडले आहे याचाही आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास आयर्लंडचेपंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी वराड (ता. मालवण) येथे व्यक्त केला.शासकीय पातळीवर दौºयाचे आयोजन न करता घरगुती स्तरावर पंतप्रधान लिओ वराडकर यांचा खासगी दौरा होता. कोणत्याही शासकीय यंत्रणेला दौºयाची कल्पना नव्हती, असे चित्र होते. रविवारी सकाळी सिंधुदुर्गातील मालवण वराड या गावी ‘वरदश्री’ या निवासस्थानी लिओ वराडकर व कुटुंबीयांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान वराडकर यांनी गाडीतून उतरताच भारतीय पद्धतीने उपस्थितांना नमस्कार केला. यावेळी गावकऱ्यांनीही मालवणी बोली भाषेत जयघोष करत स्वागत केले. सुवासिनींनी पंचारती ओवाळल्या. अगदी लहानांपासून थोरांनी वराडकर यांना गराडा घातला. डॉ. लिओ यांच्या सोबत त्यांचे वडील डॉ. अशोक वराडकर, आईमेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले व संपूर्ण कुटुंबीय उपस्थित आहे.डॉ. लिओ वराडकर यांनी येथील मालवणी जेवणाचाही आस्वाद घेतला. त्यानंतर गावात आंबा काजू बागेत फेरफटका मारला. गावातील शाळेत विध्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील वेताळ मंदिर व कट्टा येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली. वराड येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी दुभाषिकांची भूमिका बजावली.भारतात गेल्या २५ वर्षांत येथील विकासाचा वेग वाढला आहे.दोन्ही देशांत अधिक चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक जण पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांच्यासोबत सेल्फी व फोटो काढत होते. कोणताही मोठेपणा न ठेवता वराडकर सर्वसामान्यात मिसळत होते. यातून त्यांची सर्वसामान्य माणसाबद्दलची आपुलकी स्पष्ट दिसून आली.देवाच्या प्रार्थनेत मोठी शक्ती२०१७ साली मी आयर्लंडचा पंतप्रधान झालो. यावेळी वराड गावात ग्रामस्थांनी माझ्यासाठी देवालयात प्रार्थना केली. मी धार्मिक नाही मात्र मला कल्पना आहे, की प्रार्थनेत मोठी शक्ती असते.- डॉ. लिओ वराडकर, पंतप्रधान, आयर्लंड
आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आले कोकणातील मायभूमीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 4:52 AM