कणकवली : महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल या भीतीने भाजपाचे अनेक आमदार व भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत . त्यांना थांबविण्यासाठी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना आघाडी सरकार लवकरच पडेल असे वक्तव्य करावे लागले.
यापुढे जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व रवींद्र चव्हाण करतील हे स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्गातील कार्यकर्ते , जनता व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना राणेंची भूमिका व नेतृत्व मान्य नसल्यानेच चव्हाण यांना जिल्ह्यात आणून भाजपाची भूमिका मांडावी लागली . अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.कणकवली येथील विजय भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, रवींद्र चव्हाण यांनी आमच्यावर टीका करण्यापूर्वी माहिती घेणे गरजेचे होते . गतवर्षीची भात शेती नुकसान भरपाई पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने या वर्षीची ही भातशेती नुकसान भरपाई दिली जाईल .गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली हे जिल्हावासीयांसाठी महाविकासआघाडीचे मोठे काम आहे . गेली पंचवीस वर्षे जे राणेंना जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात करून दाखवले .काजू बीला ५ टक्के जीएसटी लागू केला त्यातील अडीच टक्के जीएसटीचा परतावा सरकारकडून दिला नाही . हा जर परतावा केंद्र सरकारने दिला तर जे काजू व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत त्यांना दिलासा मिळाला असता . आंबा , काजू पिक विम्याचे जनतेला पैसे मिळायला लागले. मात्र , केंद्राने निकषात बदल केल्यामुळे यावर्षी आंबा , काजूचे पीक विमा शेतकऱ्यांनी काढले नाहीत . यासाठी केंद्राचे निकष बदलायला हवेत . याकडे भाजपाचे दुर्लक्ष होत आहे.सिंधुदुर्गात गेल्या ९ महिन्यात कोरोनामुळे अनेक विकास कामे थांबून राहिली . यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खराब झाली . ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणण्यात आली . त्यामुळे येत्या महिन्याभरात पूरहानी मधून ५० कोटी व बजेट मधून १०० कोटीचा निधी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी मंजूर होईल .मच्छीमारांसाठी पॅकेज आमच्या सरकारने जाहीर केले . त्यातील दहा ते बारा कोटी सिंधुदुर्गातील मच्छीमारांना द्यायची जबाबदारी आमची आहे . मच्छीमाराना ही मदत आम्ही मिळवून देऊ . सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आरोप करत असताना बँकेच्या कारभाराबाबत रवींद्र चव्हाण यांनी अगोदर माहिती घ्यावी . सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून , जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहोत .
मात्र जिल्हा बँकेतून कर्ज दिलेल्या १२ बोलेरो गाड्या व अन्य गाड्यानाही जप्तीची नोटीस काढल्याने सावंत यांच्यावर भाजपावाल्यानी टीका सुरू केली आहे. त्यामुळे सतीश सावंत यांना आम्ही निश्चितच सांगू की रवींद्र चव्हाण यांना जिल्हा बँकेचे रेकॉर्ड दाखवावे . त्यानंतर त्यांची बँकेच्या कारभाराबाबत खात्री होईल .
येत्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. जिल्हा बँकेत कोणी किती कर्ज घेतले ? व त्या कारणासाठी कुणी कसा दबाव आणला? त्याची माहिती सतीश सावत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांनी घ्यावी असा टोला नाईक यांनी लगावला .नारायण राणेंचा मुख्यमंत्रीपदाचा दावा नितेश राणे यांनी खोडला !मुख्यमंत्री होण्याची यापूर्वी अनेकदा इच्छा व्यक्त केलेल्या नारायण राणे यांचा मुख्यमंत्रीपदाचा क्लेम त्यांच्या मुलानेच खोडला आहे . आमदार नितेश राणे यांनी मान्य केले की यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होऊ शकतात. असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला.