सिंधुदुर्ग : जानवली घरफोडी प्रकरणी चोरी करणारे नाशिकचे जोडपे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:26 PM2018-03-06T16:26:08+5:302018-03-06T16:28:34+5:30
जानवली-रामेश्वरनगर येथे १ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या चोरीप्रकरणी नाशिक येथील एका जोडप्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलिसांनी अटक करून अधिक तपासासाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कणकवली : जानवली-रामेश्वरनगर येथे १ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या चोरीप्रकरणी नाशिक येथील एका जोडप्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलिसांनी अटक करून अधिक तपासासाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दिवसाढवळ्या चोरी करणारी जोडगोळी पोलिसांच्या ताब्यात मिळाल्याने आता अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्यास मदत होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पकडण्यात आलेले पती-पत्नी सराईत गुन्हेगार आहेत. दोघांवरही गोवा, सांगली, पुणे, रायगड येथे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कणकवली तालुक्यातील जानवली-रामेश्वरनगर येथे १ डिसेंबर २०१७ रोजी सुजाता गणपत सावंत यांचे दिवसाढवळ्या घर फोडून घरातील ४ लाख ७० हजार रुपयांचे दागिने व रोख २ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. या कारवाईत मयूर सोपान भुंडे उर्फ अमित (३१, रा. साईलीला अपार्टमेंट, उज्ज्वलनगर, बोरगड, ता. जि. नाशिक, मूळ रायगड) व त्याची पत्नी सोनाली (२७) यांना अटक करण्यात आली आहे.
चोरीच्या तपासासाठी या दोघांनाही स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गने कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस हवालदार सुधीर सावंत, हवालदार आशिष गंगावणे, महिला पोलीस हवालदार वर्षा मोहिते, पोलीस नाईक संतोष सावंत, नाईक कृष्णा केसरकर, कॉन्स्टेबल सत्यजित पाटील यांच्या पथकाने केली.
जोडप्यासाठी रचला सापळा; आणखी चोऱ्या उघड होणार
मयूर सोपान भुंडे व सोनाली भुंडे यांच्यावर सिंधुदुर्ग, पुणे, कऱ्हाड , नाशिक, सांगली, सातारा येथे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांबाबत चौकशी करण्यासाठी मयुर व सोनाली हे जोडपे पोलिसांना हवे होते. १ डिसेंबर २०१७ रोजी रामेश्वरनगर येथे दिवसाढवळ्या चोरी केली होती. शेजाऱ्यांनी कुणीतरी पती-पत्नी रामेश्वरनगर येथे सकाळी ११ च्या दरम्याने फिरताना पाहिले होते. तोच धागा पकडून पोलिसांनी या जोडप्याला पकडले आहे.
मयूर भुंडे व सोनाली भुंडे यांच्या जबाबातून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे. जानवली-रामेश्वरनगर येथे १ महिन्यापूर्वी झालेल्या चोरीप्रकरणी या दोघांचा हात आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे प्रभारी पोलीस निरीक्षक पी. एन. पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.