कनेडी : कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून निविदेची मुदत संपली तरी अद्याप पायाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करीत त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करीत शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोर उपोषण आंदोलन केले होते. बांधकाम विभागाकडून त्याची दखल घेत अखेर निकृष्ट बांधकाम तोडण्यात आले.कनेडी विभागाच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी या बांधकामाची पाहणी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी इमारतीच्या पायाचे बांधकाम करताना काँक्रीट घातलेच नाही. केवळ खडी टाकून त्यावर जांभा दगडाने बांधकाम सुरू केले असल्याचे निदर्शनास आणले होते.
ही बाब गंभीर असल्याने भविष्यात इमारतीसाठी धोकादायक असल्याने पालकमंत्री, खासदार यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत पायाचे केलेले बांधकाम त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारावर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कणकवली येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडले होते.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देत ठेकेदारावर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर प्रशासनाला कारवाईसाठी पंधरा दिवसांची मुदत देत शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले होते.पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेले आदेश आणि शिवसैनिकांनी उपोषण करीत त्या निकृष्ट बांधकामाकडे लक्ष वेधल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून इमारतीच्या पायाचे बांधकाम तोडून घेतले. ठेकेदाराने इमारतीच्या पायासाठी लावलेले जांभा दगड काढून टाकण्यात आले. यावेळी ठेकेदाराने इमारतीच्या पायासाठी मारलेली चरी ही कमी खोलीची असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठेकेदाराकडून पुन्हा चरी खोदाई करून घेण्यात आली. काम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याच्या सक्त सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.पालकमंत्री, खासदारांकडून उपोषणाची दखलकनेडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही इमारत महत्त्वाची आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम दर्जेदार होणे आवश्यक आहे. जनतेच्या हितासाठी कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी घेतली. त्यानंनी तातडीचे आदेश देत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले आहे.