सावंतवाडी : मोर्ले, पारगड रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, या मागणीसाठी बुधवारपासून मोर्लेवासीय ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सायंकाळी म्हणजे गुरूवारी माजी आमदार राजन तेली यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. जर कामाला सुरूवात करायची नव्हती तर कामाचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेच कसे, असा सवाल केला. पालकमंत्र्यांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप मोर्ले सरपंच सुजाता मणेरीकर यांच्यासह ग्रामस्थांनी केला.यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमानंद देसाई, प्रदीप नाईक यांच्यासह नूतन सरपंच महादेव गवस, ग्रामस्थ रघुवीर शेलार, ज्ञानेश्वर चिरमुरे, प्रकाश पवार, बुधाजी पवार, रमेश गवस, प्रकाश नाईक, महादेव गवस, रामदास पेडणेकर, अविनाश गवस, लुमा गवस, राजन सुतार, आकाश गवस आदी उपस्थित होते.
मोर्ले, पारगड घाटरस्ता व्हावा यासाठी मोर्लेवासीय वनविभागासमोर उपोषण करीत आहेत. गुरूवारी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मात्र, त्यावर तोडगा निघत नाही. मोर्ले पारगड हा घाटरस्ता असून, यातील काही भाग कोल्हापूर व सिंधुदुर्गमध्ये येतो. त्यामुळे दोन्ही बांधकाम विभाग मिळून त्यावर तोडगा काढणे अपेक्षित आहे.
या रस्त्याचे गेल्यावर्षी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत भुमिपूजनही झाले आहे. पण रस्त्याचे काम पुढे सुरू झाले नाही. या रस्त्याची निविदा प्रकिया होऊन ठेकेदारही नेमण्यात आले आहेत. पण त्यांनीही यातील काही जागा वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने काम सुरू केले नाही.
त्यामुळे यावर तोडगा काढला जावा व रस्त्याचे काम सुरू करावे एवढीच मागणी या ग्रामस्थांची आहे. वनविभागाने आपला प्रश्न निकाली काढत रस्ता प्रश्नाचा चेंडू बांधकामच्या कोर्टात ढकलला आहे. पण बांधकाम विभागाने यावर उशिरापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मोर्लेवासीय वनविभागाच्यासमोर बसून होते. यावेळी मोर्ले सरंपच सुजाता मणेरीकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले.
जर रस्ता करायचा नव्हता तर आमची फसवणूक कशाला केली. भूमिपूजन कसे काय करण्यात आले, असे सवाल केले. आम्ही एखादे काम करीत असताना सर्व परवानग्या घेतो आणि नंतर काम सुरू करतो. मग पालकमंत्र्यांनी भूमिपूजन करीत असताना त्यांच्या परवानग्या घेतल्या नव्हत्या का, असा सवाल ही यावेळी केला. तसेच जोपर्यंत यावर रितसर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला.
दरम्यान, वनविभागाच्यावतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी गुरूवारी सकाळी उपोषणस्थळी जाऊन मोर्लेवासीयांची भेट घेतली व त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. वनविभाग आपला प्रश्न सोडविण्यास तयार असला तरी बांधकामने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
राजकीय नेत्यांकडून ग्रामस्थांची दिशाभूल
मोर्ले, पारगड रस्ता हा कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे अधिकारी यावर तोडगा काढू शकतात. पण पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावर्षी भूमिपूजन केले व निविदाही काढली. पण तांत्रिक अडचणी असल्याने त्यांचे काम सुरू झाले नाही.
भूसंपादन तसेच वनविभागाला जमीन देणे, असे अनेक प्रश्न यातून उभे राहिले आहेत. असे असतानाही काही राजकीय नेते ग्रामस्थांना आम्ही तुमचे तारणहार असे सांगत आहेत व ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
वनविभागाकडून तोडगा, वृक्षतोड धिम्या गतीनेवनविभागाने ग्रामस्थांना तोडगा काढण्याचे आश्वासन दिले तसेच वृक्षतोड गुरूवारपासून सुरू ही केली. पण प्रत्यक्षात तीनच वृक्ष तोडण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दोन कटर ठेवण्यात आले होते. पण यातील एक कटर तुटला त्यामुळे सध्या एकच कटर काम करीत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आम्ही उपोषण केले म्हणून फक्त तीन झाडे तोडली का, असा सवालही ग्रामस्थांनी विचारला आहे.