तळवडे : सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांनी स्वत: भातशेतीवर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तत्काळ भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. क्यार वादळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता ते जिल्ह्यात आले होते.तळवडे, तुळस, बांदा परिसर तसेच अनेक ठिकाणी ग्रामीण भागात शेतमळ्यात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व आपल्या पाठीशी प्रशासन आहे, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सभापती पंकज पेडणेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, तालुका कृषी अधिकारी आर. टी. चौगुले, प्रशांत चव्हाण, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर, कृषी सहायक यशवंत गवाणे, ग्रामसेवक एन. ए. राऊळ, तलाठी श्रुती मसुरकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्ह्यात नुकसानग्रस्त भातपिकाची पाहणी करण्यासाठी मंत्री, अधिकारीवर्ग, लोकप्रतिनिधी दौरे आखत आहेत. आज गरीब शेतकरीवर्गाची एवढीच मागणी आहे की, जी आम्हांला भातपिकाची नुकसान भरपाई देणार ती वेळेत द्यावी. तुटपुंजी देऊ नका, अशी मागणीही या शेतकरीवर्गातून करण्यात आली.आयुक्तांचा शेतकऱ्यांशी प्रथमच थेट संवादरविवारी प्रथमच कोकण आयुक्तांचा दौरा झाला. यावेळी त्यांनी शेतमळ्यावर जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी सहाय्यक यांच्याशी त्यांनी बातचीत केली. आज प्रशासकीय अधिकारी शेतमळ्यावर धावून आले आहेत. आज बळीराजा संकटात सापडला असून, त्याला भरपाईची गरज आहे. सरकारने ती लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.