कोकण विभागासाठी रत्नागिरीमध्ये विद्यापीठ सुरू करा, खर्डेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 03:48 PM2018-01-17T15:48:21+5:302018-01-17T15:48:46+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन वेंगुर्ले बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी वेंगुर्ले तहसीलदार यांना दिले.
सिंधुदुर्ग - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षात शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरु आहे त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन वेंगुर्ले बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी वेंगुर्ले तहसीलदार यांना दिले.
बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्याल ते वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय अशी विद्यार्थ्यानी रॅली काढून सदर निवेदन वेंगुर्ले तहसील कार्यालयात नायब तहसीलदार रश्मी मठकर यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संतोष बांदेकर,प्रा महेंद्र नाटेकर, वेंगुर्ले माजी सभापती जयप्रकाश चमणकर,प्राचार्य विलास देऊलकर,प्रा. पी. डी .होडावडेकर,प्रा.देवीदास आरोलकर, प्रा. जे .वाय नाईक, प्रा. एम. बी चौगले, प्रा. सुनिल भिसे,प्रा. जी .पी .धुरी ,प्रा आनंद बांदेकर व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या दिलेल्या निवेदनात विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर मध्ये विद्यापीठ आहे मात्र कोकण विभागासाठी विद्यापीठ नसल्याने कोकणावर हा अन्याय आहे.मुंबई महसूल विभागात कोकण विद्यापीठात भारतातून विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने ते भारतीय विद्यापीठ झाले आहे त्यामुळे विद्यार्थी पालक प्राध्यापक प्राचार्य व संस्था चालक यासर्वांवर अन्याय होतो. सुरुवातीस मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उत्तम होता मात्र गेल्या पंधरा वर्षापासून तो ढासळत चालला आहे. यावर्षी विद्यापीठाने ऑनलाइन पेपर तपासण्याचा निर्णय घेवून त्वरित अंमलबजावणी केल्याने पुरवनी तपासली तर उत्तरपत्रिका तपासली नसल्याने विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले त्यामुळे ४० हजार विद्यार्थ्यानी फेरतपासनीसाठी अर्ज केले २८ हजार उत्तरपत्रिका ग़ायब असून ५८ उत्तरपत्रिका तपासण्याचे काम चालू असल्याचे जाहिर केले आहे. पुढील शिक्षण घेण्याच्या दुर्ष्टीने ३१ मे पर्यंत निकाल जाहिर होणे आवश्यक असताना संपूर्ण निकाल अजूनही लागला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले. तसेच गेल्या तीन वर्षीत नापास विद्यार्थ्यानी फेर तपासणी केल्यास बहुसंख्य विद्यार्थी पास झाल्याने विद्यापीठाची विश्वासहर्त कमी होत आहे. कोकणी विद्यार्थी शिक्षण घेवून उपजीविकेचे साधन शोधतो मात्र मुंबई विद्यापीठाच्या या अनागोंदी कारभाराने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त होत असल्याने स्वतंत्र कोकण विद्यापीठ ही कोकणची गरज आहे. रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ चालू करून विद्यापीठाचे एक उपकार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ओरस येथे तर रायगड व ठाणे जिल्ह्यासाठी पनवेल येथे उभारल्यास कोकणातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यास मेडिकल ,इंजीनियरिग, तंत्रशिक्षण कोकणातच मिळणार.
सात लाख विद्यार्थी असलेले मुंबई विद्यापीठ सुव्यवस्थित चालविणे कठीण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे नाहीतर आंदोलन करून सुव्यवस्था धोक्यात आल्यास त्यास शासन जवाबदार राहणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.