सुधीर राणे कणकवली : पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात कणकवलीतील उदयोन्मुख शास्त्रीय संगीत गायक मनोज मेस्त्री यांची संगीत मैफिल झाली . या संगीत मैफिलीच्या माध्यमातून कोकणच्या या सुपुत्राने बाबा आमटेना सुरमयी मानवंदना दिली. तसेच रसिकांना मंत्रमुग्ध करीत त्यांची मने जिंकली.हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचा २३ डिसेंबर रोजी वर्धापन दिन होता. तर २५ डिसेंबर हा डॉ. मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस व २६ डिसेंबर हा पद्मविभूषण बाबा आमटे यांचा १०५ वा जयंती दिन आणि पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचा वाढदिवस होता.
या अनोख्या दिनविशेषाच्या औचित्यावर साजरा झालेल्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये मनोज मेस्त्री यांनी आपल्या सुरेल सुरातून "प्रकाशली सारी मने " या सांगीतिक कार्यक्रमातून स्वरमयी शुभेच्छा दिल्या. तसेच हेमलकसावासिय, तेथील आश्रमशाळेतील विद्यार्थी व तिथे आलेल्या असंख्य अभ्यागतांना सुखद अनुभूती दिली.या मैफिलीची संकल्पना स्वरदीक्षा , मुंबई या संस्थेने साकारली आणि त्यानिमित्त पं. समीर दुबळे यांचे शिष्य मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मनोज मेस्त्री यांनी या मैफिलींमध्ये प्रथम राग मारुबिहाग मधील "अब मै यूही जाऊ" हा विलंबित बडा ख्याल व त्यानंतर मध्यलय त्रिताल मधील "नैना लागाई" व द्रुत ऐकताल मध्ये "आज रे बधावा गावो" हे बंदिश गाऊन शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला. त्यानंतर मराठीतील सुपरिचित अशी नाट्यपदे व भावगीत, अभंग गायन करून रसिकांना खिळवून ठेवले.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीचे निवेदन कवी गीतकार मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत करत या मैफिलीत रंगत आणली. या मैफिलीला तबला साथ नागपूर येथील प्रमोद बामणे व संवादिनी साथ नागपूरचे राहुल मानकर व तालवाद्यसाथ भूषण जाधव यांनी केली. पंकज डांगरे यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळली.या मैफिलीस डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे तसेच अनिकेत आमटे, डॉ. दिगंत आमटे व आमटे परिवार तसेच हत्तीमित्र आनंद शिंदे हे विशेष उपस्थित होते. मैफिलीनंतर पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते मनोज मेस्त्रींना स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या पुढील सांगीतिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वरदिक्षाच्या मानसी कुलकर्णी, अमोल चौधरी, श्रिया पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.