कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या १७ प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून, यामध्ये अनुसूचित जाती १, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण २, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३, सर्वसाधारण महिला ६ व सर्वसाधारण ५ अशाप्रकारे आरक्षण जाहीर झाले आहे. पाच वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या कुडाळ नगरपंचायतीची दुसरी निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. या आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का बसला असून, त्यांना दुसऱ्या प्रभागाची वाट धरावी लागणार आहे.दरम्यान, या निवडणुकीची तयारी निवडणूक विभागाने सुरू केली असून, बुधवारी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात कणकवली प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत शहरातील १७ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी सुरेल परब, मुख्याधिकारी नितीन गाढवे, संदीप कोरगावकर व अन्य अधिकारी तसेच नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्षा सायली मांजरेकर, विद्यमान नगरसेविका, नगरसेवक, इच्छुक उमेदवार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग आरक्षणाची सोडत विद्यार्थिनी गायत्री मडवळ व युक्ता कुडाळकर यांच्या हस्ते काढण्यात आली.दरम्यान, आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांपैकी काहींची निराशा झाली तर काहीजण आनंदित झाले. सध्याच्या परिस्थितीत जास्तीत जास्त नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढवायची असल्यास दुसरा प्रभाग शोधावा लागेल, असेच चित्र जाहीर झालेल्या आरक्षणावरून दिसून येत आहे.कुडाळ नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षणप्रभाग क्रमांक १ कविलकाटे (नामाप्र महिला), प्रभाग क्रमांक २ भैरववाडी (नामाप्र महिला), प्रभाग क्रमांक ३ लक्ष्मीवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ४ बाजारपेठ (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक ५ कुडाळेश्वरवाडी (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ६ गांधी चौक (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक ७ डॉ. आंबेडकरनगर (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक ८ मज्जिद मोहल्ला तुपटवाडी (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक ९ नाबरवाडी (सर्वसाधारण ), प्रभाग क्रमांक १० केळबाईवाडी (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक ११ वाघसावंत टेंब, गणेश नगर (अनुसूचित जाती), प्रभाग क्रमांक १२ हिंदू कॉलनी (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक १३ श्रीरामवाडी (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १४ अभिनव नगर (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १५ कुंभारवाडी (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक १६ एमआयडीसी (सर्वसाधारण), प्रभाग क्रमांक १७ सांगिर्डेवाडी (नामाप्र महिला) असे आरक्षण पडले आहे.