डोळे काढण्याची भाषा दानवेंना अशोभनीय
By admin | Published: June 26, 2015 10:10 PM2015-06-26T22:10:05+5:302015-06-26T22:10:05+5:30
धीरज परब : अटक करण्याची निवेदनातून मागणी
कुडाळ : राजन तेली व भाजप कार्यकर्त्यांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचे डोळे फोडल्याशिवाय राहणार नाही, असे चिथावणीखोर वक्तव्य करून राजकीय दहशत निर्माण करू पाहणाऱ्याभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर जिल्ह्यातील सार्वजनिक शांततेचा भंग करून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब व कुडाळ तालुका मनसेच्यावतीने निवेदनातून जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे केली.
या निवेदनात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब म्हणाले की, भाजपाच्यावतीने मंगळवारी कार्यकर्ता मेळावा शिबिरामध्ये राजन तेली व भाजप कार्यकर्त्यांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचे डोळे फोडल्याशिवाय राहणार नाही, असे चिथावणीखोर वक्तव्य
केले.दानवे यांचे असे वक्तव्य म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने सिंधुदुर्गातील सर्वसामान्य जनतेला दिलेली ही जाहीर धमकीच आहे. दानवेंच्या या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक शांततेचा भंग झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय दहशत करू पाहणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. राजकीय दबाव झुगारुन दानवे यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनसे महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेेंडे, मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष बाबल गावडे, दीपक गावडे, सुश्मित देसाई बांबुळकर, जगन्नाथ गावडे, प्रथमेश धुरी, अभय पाटील, ऋषिकेश तावडे, प्रथमेश चव्हाण, नंदू आंदुर्लेकर, अमोल भेंडे आदी मनसेचे जिल्हा व कुडाळ तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)