सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोने मृत्यू दहा, मात्र सरकारी आकडा तीन, पालकमंत्र्यांना आश्चर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:21 PM2017-11-20T16:21:13+5:302017-11-20T16:52:33+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोच्या आजाराने तिघांचाच मृत्यू झाल्याचे चक्क पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर आरोग्य विभागाने सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला तो कशाने, असा सवाल आरोग्य विभागाला केला असता अन्य मृत्यूंबाबत नेमके कारण आमच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोच्या आजाराने तिघांचाच मृत्यू झाल्याचे चक्क पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर आरोग्य विभागाने सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला तो कशाने, असा सवाल आरोग्य विभागाला केला असता अन्य मृत्यूंबाबत नेमके कारण आमच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यापुढे तापसरीने मृत्यू होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री केसरकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
सिंधुदुर्गमध्ये तापसरीने गेल्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर आरोग्य विभागाची खास बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, आरोग्य अधिकारी योगेश साळे, एस. व्ही. कुलकर्णी, सावंतवाडी वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील, दोडामार्गचे बी. ए. ऐवाळे, श्रीपाद पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी एस. जी. सावंत, प्रभारी गटविकास अधिकारी विनायक नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी, दीपाली सावंत आदी उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर यांनी तापाच्या साथीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच उपाययोजना काय करण्यात येणार याची विचारणा केली. त्यावर आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी प्रत्येक गावाचा तापसरीचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले. वेगवेगळ्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
हा हंगाम भातकापणीचा असल्याने जास्तीत जास्त तापाचे रुग्ण दाखल होत आहेत. लेप्टोचे रुग्ण दाखल होण्यामागे उंदरांचे मलमूत्र हेच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत तापाने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात लेप्टोसदृश तापाने तिघांचा मृत्यू झाला आहे, असे सांगितले.
अन्य लोकांचा मृत्यू कसा झाला यावर बोलताना डॉ. साळे म्हणाले, या मृत्यूंबाबत आमच्याकडे अंतिम अहवाल आला नाही. त्यामुळे त्यांना कोणता आजार झाला हे सांगणे कठीण आहे. यावेळी मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी व कुडाळचा आढावा घेतला. यात सावंतवाडीत रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र रुग्णांना ठेवण्यासाठी खाटांची संख्या कमी आहे, असे वैद्यकीय अधीक्षक पाटील यांनी सांगितले. त्यावर मंत्री केसरकर यांनी खासगी रुग्णालयाशी संपर्क करा. तसेच काही रुग्ण ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवा, असे सांगितले.
गोवा-बांबोळी येथे दाखल केलेल्या रुग्णांना परत पाठवले जाते अशी तक्रार दोडामार्ग सभापती गणपत नाईक यांनी केली. त्यावर मंत्री केसरकर यांनी बेळगाव तसेच कोल्हापूर येथील रुग्णालयांशी संपर्क करा. तसेच गोव्यातील मणिपाल रुग्णालयाशी चर्चा करा, असे सांगितले.
जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी सोमवारी मणिपाल येथील रुग्णालयाला भेट देणार आहेत. प्रत्येक गावागावात जनजागृतीसाठी रिक्षा फिरविण्यात येणार आहे. शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून संशयास्पद व्यक्तींची आरोग्य तपासणीही करण्यात येईल, अशी माहितीही आरोग्य अधिकाऱ्यांनी मंत्री केसरकर यांना दिली आहे.
तसेच तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक यांच्या बैठका घेऊन तापाच्या साथीबाबत जनजागृती करावी व यातून मार्ग काढावा, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
उंदीर मारण्याचा धडक कार्यक्रम हाती घ्या
दीपक केसरकर म्हणाले लेप्टोसारखा आजार हा शेतात काम करणाऱ्या शेतकरीवर्गात जास्त होताना दिसत आहे. शेतात उंदरांचे मलमूत्र पसरते. त्यातून हा आजार पसरत चालला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय व कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे उंदीर मारण्याचा धडक कार्यक्रम हाती घ्यावा. यासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल, असेही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
अनुपस्थित अधिकाऱ्यांची यादी मागविली
जे अधिकारी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीला हजर नाहीत, अशा अधिकाऱ्यांची माहिती मंत्री केसरकर यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे मागविली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. गंभीर आजाराबाबत सर्वांनीच दक्ष रहावे, असे आवाहनही मंत्री केसरकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले आहे.