प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळे, उंबर्डेत संतप्त ग्रामस्थांचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 05:18 PM2020-01-03T17:18:29+5:302020-01-03T17:21:15+5:30
उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार थांबवून रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी उंबर्डे परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या अटकावाला न जुमानता आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.
वैभववाडी : उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार थांबवून रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी उंबर्डे परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या अटकावाला न जुमानता आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.
यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर सायंकाळी उशिरा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे उंबर्डेत दाखल झाले होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात अनागोंदी कारभार तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मनमानी सुरू असल्याची लेखी तक्रार करीत या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी उंबर्डे सरपंच एस. एम. बोबडे यांनी केली होती. अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. किंबहुना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारातही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करीत गुरुवारी सकाळी उंबर्डे पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ आरोग्य केंद्राच्या परिसरात जमले होते.
यात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे, एस. एस. बोबडे, दशरथ दळवी, किशोर दळवी, सदानंद दळवी, उमर रमदुल, रजब रमदुल, उदय मुद्रस, जगदीश मोपेरकर, महंमद पाटणकर, खुदबुद्दीन रमदुल, कादीर नाचरे, यासीन बोबडे, हमीद नाचरे, दस्तगीर मनाजी, रवींद्र पांचाळ, बादशाह रमदुल, रमेश केळकर, अलिबा बोथरे आदींचा समावेश होता.
आरोग्य नव्हे तर आंदोलन केंद्र
उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अठरा गावांचे आशास्थान आहे. मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण प्रशासकीय अनास्थेपायी सहा वर्षे रेंगाळले होते. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडेही जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे वेळोवेळी दिसून येते. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळेच उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य केंद्र न राहता कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आंदोलन केंद्र बनत चालले आहे.