बोर्डवे येथील मशिदीच्या फंडपेटीतील पैसे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 01:59 PM2019-12-04T13:59:49+5:302019-12-04T14:05:25+5:30
बोर्डवे-मुस्लिमवाडी येथील जुम्मा मशिदीमधील फंडपेटीतील ३ हजार रुपये दोन संशयित चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली : बोर्डवे-मुस्लिमवाडी येथील जुम्मा मशिदीमधील फंडपेटीतील ३ हजार रुपये दोन संशयित चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोर्डवे मुस्लिमवाडी येथे कुतुबुद्दीन इस्माईल शेख राहतात. जुम्मा मशिदमध्ये नमाज व धार्मिक कार्यक्रम ते करतात. या मशिदीमध्ये प्रवेश करून २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तेथीलच दोन व्यक्तीनी कुलूप न लावलेल्या फंडपेटीतून पैसे चोरून नेले आहेत, असा फोन कुतुबुद्दीन यांना त्यांचा भाऊ आसिफ शेख यांनी केला. तसेच त्या दोन संबंधित व्यक्ती चोरी करून जात असताना काही लोकांनी त्यांना पाहिले होते.
त्यानंतर लगेचच कुतुबुद्दीन शेख मशिदीमध्ये आल्यानंतर वाडीतील सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन मशिदीमध्ये चोरी झाल्याची खात्री केली. तसेच पैसे चोरणाऱ्या दोन्ही संशयितांकडे सर्वजण गेले असता त्यांचे घर बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच दोन संशयितांनी चोरी केली असावी अशी शंका व्यक्त केली.
संबंधित फंडपेटीतील रक्कम दरवर्षी आॅगस्ट महिन्यात मोहरम सणासाठी वापरली जाते. त्यानंतर फंडपेटी गेल्या चार महिन्यांपासून उघडण्यात आली नव्हती. अंदाजे ३ हजार रुपयांची रक्कम त्या फंडपेटीत जमा झाली असावी.
ही रक्कम त्या दोघा संशयितांनी लंपास केल्याचे कुतुबुद्दीन शेख यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे संशयितांविरोधात चोरी केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.