कणकवली : भाजपामध्ये माझा लवकरच प्रवेश होईल. हा कार्यक्रम मुंबईतच होईल. मीच तशी इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली विधानसभेची जागा आमदार नीतेश राणे यांनाच मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे नारायण राणे यांचा पक्ष विलिनीकरणासह भाजपा प्रवेशाचा विषय मंगळवारच्या मुख्यमंत्र्यांच्या कणकवली दौ-यातच निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी सिंधुदुर्गात दाखल होणार असल्याने या दौ-यात भाजपाप्रवेशासाठी इच्छूक असलेले माजी मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? भाजपाच्या व्यासपीठावर जाणार की नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. त्याबाबत जोरदार चर्चाही रंगली होती. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सायंकाळी कणकवलीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नारायण राणे यांनी शहरातील स्वाभिमान कार्यालयासमोर स्वागत केले. यावेळी राणे यांचे दोन्ही सुपूत्र आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे तसेच स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी थेट जाहीर सभेचे ठिकाण गाठले.
राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत आपली पुढील भूमिका जाहीर केली. यात राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांनी दिलेला शब्द ते पाळतील. लवकरच आपण मुंबईत आपल्या दोन्ही सुपूत्रांसह भाजपात प्रवेश करणार आहे. तसेच स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन करणार आहे.
नीतेश राणे कमळ निशाणीवर लढतीलआपण भाजपा प्रवेश केल्यानंतर कणकवली मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार नीतेश राणे हे कमळ निशाणीवर पुन्हा निवडणूक लढतील. आपण जेथे जावू तेथील पारडे जड असेल, असे म्हणत नारायण राणे यांनी राज्यात आगामी भाजपाची निर्विवाद सत्ता येणार असल्याचेही सांगितले. तसेच भाजपा आणि शिवसेनेची युती राहिल्यास शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नाला राणे यांनी यावेळी बगल दिली. त्याबाबतचा निर्णय नंतर घेईन, असेही राणे यांनी स्पष्ट केले.