मौल्यवान जीवन सार्थकी बनवा
By admin | Published: December 28, 2015 01:03 AM2015-12-28T01:03:23+5:302015-12-28T01:05:52+5:30
का. हु. शेख : वेंगुर्ले येथे बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिन कार्यक्रमात मार्गदर्शन
वेंगुर्ले : बॅ. खर्डेकर हे कायदे पंडित, सत्यनिष्ठा व स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. ते स्वातंत्र्य हाच आत्मा मानत. गुलामगिरीत कोणालाही ठेवायचे नाही व आपणही राहायचे नाही असे म्हणत. बॅ. खर्डेकरांनी तन, मनाने हे महाविद्यालय एक शिक्षणाचे दालन म्हणून उभे केले. त्यांच्या कार्याचे चिंतन, मनन करून मूल्यमापन करणे गरजेचे आहे. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे. आपले नशीब आपणच बनवा, कारण जीवन हे मौल्यवान आहे, असे आवाहन का. हु. शेख यांनी केले.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे उद्घाटन शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर बी. के. सी. असोसिएशनचे सतीश डुबळे, स्थानिक सल्लागार समितीचे सुरेंद्र खामकर, नगरसेवक रमण वायंगणकर, स्मृतिदिन कार्यक्रमाचे चेअरमन प्रा. एस. जे. कदम उपस्थित होते.
यावेळी मोहन होडावडेकर यांची मुंबई विद्यापीठ सर्वंकष परीप्रेक्ष्य नियोजन समिती सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन त्यांचा प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी सन्मान केला.
कर्तव्याची जाणीव व मायेची उब देणारा हा माझा सत्कार आहे. बॅ. खर्डेकर यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. त्यांनी सौंदर्याला नवीन दृष्टीने पाहिले. विद्यार्थ्यांनो, जगाची गती फार आहे. डोळे उघडे करून पहा, समाजसेवा करत स्वयंरोजगार प्रकल्प उभा करा, असे होडावडेकर यांनी सत्कारप्रसंगी सांगितले.
इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या समृद्धी पेडणेकर हिला मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह ढाल, प्रमाणपत्र व इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, बक्षिसे देऊन गौरविले. कार्यक्रमाला यूथ संस्था अध्यक्ष श्रीनिवास गावडे, कलावलयचे रमेश नार्वेकर, ए. बी. आळवे, नंदन वेंगुर्लेकर, जयराम वायंगणकर, प्रा. सिद्धार्थ फडतरे, प्रा. वीरेंद्र देसाई, सुरेंद्र चव्हाण, ए. एम. सावळे, प्रा. संजीव चमणकर, प्रा. एस. टी. भेंडवडे, डॉ. एम. एम. मुजुमदार, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वामन गावडे, पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. डी. होडावडेकर, स्वागत प्राचार्य विलास देऊलकर यांनी केले. कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. ए. एम. माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)