मालवणच्या वैद्यकीय अधीक्षकांवर दगडाने हल्ला
By admin | Published: May 25, 2015 11:39 PM2015-05-25T23:39:15+5:302015-05-26T00:57:13+5:30
आपणास शिवीगाळ केल्याबाबत डॉ. पांचाळ यांनी मालवण पोलिसात दिलेल्या पहिल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला
मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पांचाळ यांच्यावर रुग्णालयातीलच शिपाई भास्कर साळुंखे याने दगडाने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री १०.३० वाजता मालवण ग्रामीण रुग्णालयात घडली. साळुंखे याने मारलेला दगड डॉ. पांचाळ यांच्या हातावरील ब्रेसलेटवर बसल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
रविवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास डॉ. सुरेश पांचाळ हे रुग्णालयात जनरल रुममध्ये रुग्णाची तपासणी करीत असताना मद्यधुंद अवस्थेत असलेला शिपाई भास्कर साळुंखे हा त्याठिकाणी आला. त्याने रुग्णांच्या समक्षच डॉ. पांचाळ यांना शिवीगाळ केली. साळुंखे याला रुमबाहेर जाण्यास सांगून डॉ. पांचाळ यांनी या प्रकाराबाबत तत्काळ मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसात तक्रार करूनही साळुंखे हा थोड्या वेळाने १०.३० वाजता पुन्हा त्याठिकाणी आला व त्याने डॉ. पांचाळ यांच्यावर दगड मारला. मात्र दगडाचा हल्ला चुकविण्यासाठी डॉ. पांचाळ यांनी मध्ये हात धरल्याने दगड त्यांच्या हातातील ब्रेसलेटवर बसला. यानंतर साळुंखे याने तेथून पळ काढला. आपणास शिवीगाळ केल्याबाबत डॉ. पांचाळ यांनी मालवण पोलिसात दिलेल्या पहिल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र साळुंखे याने दगडाने हल्ला केल्याची तक्रार देण्यास गेलो असता पोलीस आपली तक्रार घेत नाही असे डॉ. पांचाळ यांनी सांगितले. तर मालवण पोलिसांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली जाईल असे सांगितले.
दरम्यान, मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी डॉ. पितळे, डॉ. चव्हाण यांनाही अशा प्रकारच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले होते. तसेच डॉ. सुरेश पांचाळ यांच्यावर हा दुसऱ्यांदा हल्ला झाला असून अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात मालवण ग्रामीण रुग्णालयाची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत चालली आहे. (प्रतिनिधी)