मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी जागेचा गुंता कायम, महसूल राज्यमंत्र्यांची बैठक निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 08:38 PM2020-11-01T20:38:12+5:302020-11-01T21:49:52+5:30
केसरकरांनी आपली जमिन द्यावी : खेमसावंत भोसले यांचा सल्ला
सावंतवाडी : सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाच्या जागेबाबतचा तिढा अद्याप सुटला नसून, या जागेचा तिढा सुटावा म्हणून महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी येथील राजवाड्यात जाउन खेमसावंत भोसले यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून जागेचा प्रश्न मार्गी लागलाच नाही. पण गुतांही अधिकच वाढला असून, खेमसावंत यांनी बैठकीत माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर शरसंधान करत आम्ही बाजार भावापेक्षा कमी दराने जमिन देत असताना तुम्ही आमची जमिन पाडून का मागता मग तुमचीच जमिन द्या, तर मंत्री सत्तार यांना तुम्ही आपली जमिन दिली असता का, असा थेट सवाल करत आम्ही आमचा प्रस्ताव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिला असल्याचे सांगितले.
सावंतवाडी मल्टी स्पेशालिटी रूग्णालयाच्या जागेबाबतचा प्रश्न अद्याप सुटला नसून, यावर तोडगा काढण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार हे रविवारी राजवाड्यात आले होते. यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना नेते वसंत केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ आदि उपस्थीत होते.
सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशालिटी रूग्णालय उभे राहत आहे, मात्र या रूग्णालयाच्या जागेचा वाद सुरू आहे. या जागेवर भुमिपूजन झाले पण अद्याप पुढचे काम सुरू झाले नाही. या जागेचा वाद सुटावा यासाठी सध्या शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पण, अद्याप तोडगा निघत नाही. त्यामुळे या जागेचा वाद मिटावा म्हणून महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी राजवाड्यात जाउन खेमसावंत भोसले यांची भेट घेतली. यावेळी खेमसावंत भोसले यांनी मंत्री सत्तार यांना आम्हाला बाजारभावाप्रमाणे जागेचा दर देउ नका मात्र त्यापेक्षा कमी दराने जागा देण्यास आम्ही तयार आहोत पण माजी मंत्री दीपक केसरकर यांनी रेडीरेकनरप्रमाणे दर दिला जाईल, असे सांगितले. त्यामुळे खेमसावंत भोसले यांनी केसरकरांवरच थेट हल्ला चढवला. आम्ही एवढी जागा दिला आहे मग तुम्ही तुमची का जागा देत नाही, असा सवाल केला. कमी भावाने जमिनीचा दर देण्यापेक्षा जमिनच फूकट घ्या, असा संताप व्यकत केला. मंत्री सत्तार यांनी यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही आमच्या दरावर ठाम असल्याचे खेमसावंत भोसले यांनी सांगितले.
यावेळी मंत्री सत्तार यांनी तुम्ही राजा आहात तुमचेच हे सगळे आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या कामाला जमिन देणार आहात त्यामुळे त्यावर तोडगा काढा, अशी विनवणी केली, पण खेमसावंत भोसले यांनी याला स्पष्ट शब्दात नकार दिला. तसेच आम्ही आमचा प्रस्ताव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी यांनाही कल्पना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री सत्तार यांनी आम्ही औरंगाबाद येथे वैद्यकीय महाविाद्यालयासाठी १०० एकर जमिन दान स्वरूपात दिल्याची आठवणही खेमसावंत भोसले यांना सांगितली. मात्र, मंत्री सत्तार यांनी बरीच विनवणी केली, पण त्यातून कोणताही तोडगा निघत नसल्याचे बघून मंत्री सत्तार यांनी काढता पाय घेत तर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी राजघराण्याचा काहि तरी गैरसमज झाला असेल तो दूर केला जाईल, असे सांगितले.