नुकसानीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, वनविभाग अंधारात, घाटीवडेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 04:35 PM2020-09-25T16:35:11+5:302020-09-25T16:36:46+5:30
दोडामार्ग : शासनाने संपादित केलेल्या जागेसह घाटीवडे येथील सामाईक क्षेत्रात कोणत्याही परवानगीविना केळी, नारळ व काजू लागवड करण्यात आली ...
दोडामार्ग : शासनाने संपादित केलेल्या जागेसह घाटीवडे येथील सामाईक क्षेत्रात कोणत्याही परवानगीविना केळी, नारळ व काजू लागवड करण्यात आली आहे. त्यातील हत्ती व अन्य वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची बनावट कागदपत्रे करून शासनाच्या तिजोरीतील लाखो रुपये उकळण्याचा प्रकार झालेला आहे.
अशा संबंधितांची चौकशी व्हावी व त्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येथील रामराव देसाई आणि सचिन देसाई यांनी जिल्हाधिकारी व वनक्षेत्रपाल यांच्याकडे सादर केले आहे. अन्यथा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही दिला आहे.
या निवेदनात रामराव देसाई यांनी म्हटले आहे की, गाव घाटिवडे येथील जमिनीचे क्षेत्र सामाईक आहे. त्यातील काही सहहिस्सेदारांनी सामाईक क्षेत्रात अन्य कोणाचीही सहमती न घेता भरमसाठ उत्पन्नाचे साधन केले आहे. या सामाईक क्षेत्रात त्यांच्या हिश्श्याला अल्पक्षेत्र येते. मात्र, भरमसाठ क्षेत्रात त्यांनी लागवड केलेली आहे.
सातबारात असलेल्या भागीदारांच्या परवानगीशिवाय त्यांनी आपल्या हिश्श्यापेक्षा जास्त जमीन कसली आहे. त्यांनी ज्या क्षेत्रात १२०० ते १५०० केळी, नारळ, सुपारीची लागवड केली आहे. त्यांच्या हिश्शाला तीन ते पाच गुंठे एवढेच क्षेत्र येते. त्या क्षेत्रात वरील एवढे उत्पन्न येऊ शकत नाही. परंतु ते कागदोपत्री दाखविण्यात आलेले आहे. त्यांचे नुकसान हत्ती व अन्य वन्यप्राण्यांकडून झाल्याचे दाखवून वनविभागाला अंधारात ठेवून भरपाई म्हणून हजारो रुपये उकळण्याचा प्रयत्न केला आहे.
तेवढ्या क्षेत्रात १२०० ते १५०० केळी लागवड करणे शक्य नाही. तरीही नगसंख्या वाढवून दाखविण्यात आली आहे. याची चौकशी व्हावी. तसेच आमच्या सामाईक क्षेत्रात लागवड करून आम्हांला भरपाईपैकी काहीही मिळाले नाही. तसेच वनविभागाला अंधारात ठेवून उकळलेल्या लाखो रुपयांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन दिले आहे.
यापुढे सामाईक क्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या पिकाची नुकसान भरपाई सर्वभागदारांच्या सहमतीशिवाय देण्यात येऊ नये. तसेच सर्व भागीदारांना कल्पना दिल्याशिवाय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करू नयेत असे निवेदनात म्हटले आहे.
शासनाकडून हत्ती व वन्य प्राण्यांच्या नावावर भरमसाठ भरपाई मिळवणे, खातेदारांनी त्याबाबत विचारल्यास दादागिरी करणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे देण्यात आलेल्या अर्जानुसार चौकशी करून संबंधितांवर १ आॅक्टोबरर्यंत कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास २ आॅक्टोबर रोजी बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.