'शिवसेनेचं खच्चीकरण अन् अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जात असेल तर...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 12:25 PM2021-06-18T12:25:01+5:302021-06-18T12:25:41+5:30
मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणे आणि भाजपाला टोला लगावला आहे.
सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane)यांना मंत्रिपद मिळण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मराठा नेतृत्व, येऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणुक लक्षात घेता भाजपा त्यांना संधी देईल, अशी शक्यता आहे वर्तविण्यात येत आहे. नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांवर आता शिवसेनेनही प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत म्हणाले की, नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेची कोंडी होऊ शकत नाही. शिवसेना ज्यांच्या नेतृत्वात काम करते असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्त्व अख्ख्या जगाला दिसलेलं आहे. कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे, असं उदय सामंत यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत पुढे म्हणाले की, देशातील सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेना मंत्रीपद दिल जात असेल तर हा चुकीचा समज आहे, असा टोला देखील उदय सामंत यांनी नारायण राणे आणि भाजपाला लगावला आहे.
गेल्या आठवड्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली. यात राणेंचे नाव महाराष्ट्रातून आघाडीवर आहे. राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील अशी शक्यता आहे. राणेंबरोबरच साताऱ्याचे खासदार उदयनराजे, गोपिनाथ मुंडेंच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे, भारती पवार आदी नावेही महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नारायण राणेंसाठी देवेंद्र फडणवीसांचा शब्द?
मराठा आरक्षणाचा विचार केला तर राणेंबरोबर उदयनराजेंचेही नाव मंत्रिपदासाठी तितकेच सक्षमपणे पुढे येऊ शकते. प्रितम मुंडे या मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करतात. या समाजाचेही आरक्षणासह इतर प्रश्न चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांचाही मंत्रिपदावरचा दावा कमजोर मानता येणार नाही. एकूणच नारायण राणेंचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यासाठी शब्द टाकल्याची चर्चा आहे.