सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीत जागा उपलब्ध न झाल्यास कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. मात्र शुक्रवारी सावंतवाडी वेत्ये येथे एक सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असल्याचे समोर येताच त्या जागेची स्वत: पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार राऊत यांच्यासह पाहणी केली आणि त्या जागेवर शिक्कमोर्तब केले आहे. त्यामुळे आता मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडी तालुक्यातच राहणार हे निश्चित झाले आहे.यावेळी वेत्ये सरपंच स्रेह मिठबावकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना सहसंर्पक प्रमुख शैलेश परब, गितेश राऊत, रूची राऊत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, सुनील गावडे, गुणाजी गावडे, नरेश मिठबावकर, माजी सभापती रमेश गावकर, राजन पवार आदी उपस्थित होते. सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे ठरले होते. त्याचे भुमिपूजनही झाले होते. मात्र राजघराण्याशी असलेल्या वादामुळे हे रुग्णालय तसेच राहिले. मात्र आता पुन्हा या रुग्णालयाच्या जागेबाबत शोधाशोध झाली. पण सावंतवाडीमध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे हे रुग्णालय कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार राऊत यांनी दिले होते. मात्र वेत्ये येथे ग्रामपंचायतच्या मालकीची सहा एकरची जागा उपलब्ध असल्याचे लक्षात आल्यानंतर अधिका-यांसह पालकमंत्री व खासदार यांनी स्वत: जागेची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही जागा मधोमध असून, सावंतवाडीपासूनही काही अंतरावर आहे. तसेच महामार्गा लगत ही जागा असल्याने अनेक दृष्टीने फायदा होणार आहे.वेत्ये येथील जागेवर पालकमंत्री सामंत यांनी शिक्कामोर्तब केले असून हीच जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वेत्ये ग्रामपंचायतचेही आभार मानले. त्यांनी ही जागा आपल्या ताब्यात ठेवली. यावेळी खासदार राऊत यांनी माझ्या बोलण्याने वेग आल्याचे सांगत टीका करणा-यांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.
ठरलं! मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 9:35 PM