नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला
By admin | Published: June 16, 2016 11:01 PM2016-06-16T23:01:30+5:302016-06-17T00:47:17+5:30
प्रभाग आरक्षण सोडत २ जुलैला : १६ आॅगस्टला मिळणार अंतिम अधिसूचना, निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर
सिंधुदुर्गनगरी, मालवण : सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण या डिसेंबर २०१६ मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषद निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. या तीनही नगरपरिषदांची प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. हा कार्यक्रम २४ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केले आहे. यामुळे या तीनही नगरपरिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी नोव्हेंबर महिन्यात उडणार आहे.
राज्यातील २०१६-१७ च्या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. राज्यातील १८ नगरपरिषदांच्या निवडणुका लागणार असल्याने पुढील कालावधी हा रणसंग्रामाचा असणार आहे.
सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वेंगुर्ला या नगरपरिषदांचा कार्यकाल १८ डिसेंबर २०१६ रोजी संपत आहे तर मालवण नगरपरिषदेचा कार्यकाल हा २४ डिसेंबर २०१६ रोजी संपत आहे. या तीनही नगरपरिषदांच्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. यानुसार २४ जून रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव यात नगरपरिषद व नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या क्षेत्र, सिमांकन नकाशा, अनुसूचित जाती व जमाती आरक्षण यासह संबंधित नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे, २९ जून रोजीपर्यंत या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देणे, ३० रोजी सदस्य पक्षांच्या आरक्षणाच्या सोडतीकरीता संकेतस्थळावर नोटीस प्रसिद्ध करणे.
आरक्षण सोडत प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी स्तरावर हरकती सुनावणीनंतर विभागीय आयुक्त यांच्यामार्फत १० आॅगस्टला प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार शहरात आठ प्रभाग निश्चित होणार आहेत.
त्यापैकी पहिल्या सात प्रभागात एक महिला एक पुरुष तर आठव्या प्रभागात दोन महिला एक पुरुष यानुसार आरक्षण निश्चित केले जाणार आहे. २७ टक्के ओबीसी कोटा तसेच यावर्षी प्रथमच अनुसूचित जातीसाठी एक जागा निश्चित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
२ जुलैला आरक्षण : १0 आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत २ जुलै रोजी काढली जाणार आहे. ५ रोजी प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना कलम १० नुसार रहिवाशांच्या माहितीसाठी तसेच स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करणे, ५ जुलै ते १४ जुलै पर्यंत हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी, २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून या हरकतींवर २ आॅगस्ट रोजी संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे तर १० आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे आणि १६ आॅगस्ट रोजी अंतिम अधिसूचना जाहिर करण्यात येणार आहे.
नोव्हेंबरमध्ये होणार निवडणूक
सावंतवाडी, वेंगुर्ले व मालवण या नगरपरिषदांचा कालावधी डिसेंबर २०१६ मध्ये संपत असल्याने साधारणत: याची निवडणूक प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.