कणकवली : नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे. कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही. काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे. कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबध गुंतलेले असू शकतील. या प्रकल्पाला एका बाजूला विविध परवानग्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे. जनता हे सर्व ओळखून असून शिवसेनेला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाही.अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केली.कणकवली येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. यावेळी नारायण राणे पुढे म्हणाले, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पक्ष स्थापनेनंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे.
या निवडणुकीत राज्यातील काही जागा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधून निलेश राणेंचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर आमची रणनीती जाहीर केली जाईल. आम्हाला सर्वदृष्टीने पोषक वातावरण आहे. या निवडणुकीत शिवसेना सोडून इतर सर्व पक्षांची मदत घेतली जाईल. इतर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी त्याबाबत मी बोलणार आहे.शिवसेना - भाजपची युती त्यांच्या कार्यकर्त्यांना पसंत नाही.जिल्ह्याजिल्ह्यात सेना भाजपमध्ये असंतोष आहे . या सर्व परिस्थितीचा फायदा अन्य उमेदवारांना होणार आहे त्यात आमचाही समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ तसेच अन्य प्रकल्प रेंगाळले आहेत. हे शिवसेनेच्या पालकमंत्र्यांचे अपयश आहे.
शिवसेनेचे खासदार, आमदार असतानाही ते तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलेले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद त्यांच्याकडे असून तेथील विकास म्हणावा तसा झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्या पेक्षा कमी आहे सर्वच क्षेत्रात तो जिल्हा पिछाडीवर आहे. त्याला शिवसेनाच जबाबदार आहे. त्याचा फटका त्यांना बसेल. असेही नारायण राणे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर कमिटी व काही नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांनी यावेळी जाहीर केल्या.स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा वेगळा !महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे इतर उमेदवार आचारसंहिता लागू झाल्यावर जाहीर करण्यात येतील. भाजपच्या जाहीरनामा बनविण्याच्या समितीत त्यांनी मला घेतले आहे. मात्र , माझा पक्ष वेगळा आहे .हे कदाचित त्यांच्या लक्षात आले नसेल. पण, या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा वेगळा असेल ,असे नारायण राणे यांनी यावेळी जाहीर केले.निवडणुकीनंतर भाजपलाच मदत!या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. फक्त शिवसेना म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी नव्हे. त्यामुळे मोदी गटासोबत आम्ही आहोत. निवडणुकीनंतर भाजपला निश्चितच मदत करण्यात येईल, असे नारायण राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान स्पष्ट केले.