कणकवली : नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर यांनी टीका केली होती. त्यामुळे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पारकर यांच्यावर टीका केली आहे. मात्र, नलावडे यांनी पारकराना निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत. असा उपरोधिक टोला नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पक्षांतराची धमकी देत नेत्यांना अधून मधून ब्लॅकमेल करणाऱ्यानी "निष्ठा" हा शब्द सुद्धा उच्चारू नये . माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते संदेश पारकर यांच्यामुळे राजकारणात आले आणि पदाधिकारी झाले.
समीर नलावडे यांचा राजकीय उदय सुद्धा संदेश पारकर यांच्यामुळेच झाला, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पारकर यांचा हात डोक्यावर नसता, तर नगरसेवक, बांधकाम सभापती आणि पंचायत समिती सदस्य अशी पदे स्वप्नातसुद्धा नलावडे यांना दिसली नसती, हे वास्तव स्वतः नलावडे विसरले असले तरी कणकवलीतील जनता विसरलेली नाही.नलावडे राजकारणाच्या नकाशावर कुठेही नव्हते तेव्हा पारकर कणकवलीचे सरपंच होते. पारकर यांनी संघर्ष करून पद मिळवले होते. "उमेदवार पाहू नका, माझ्याकडे बघून मत द्या" असा प्रचार पारकर यांच्यासाठी कोणत्याही आमदाराने केलेला नव्हता.नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर या एकट्याच नेत्याने टीका केली नाही. आणखीही बऱ्याच नेत्यांनी राणे यांच्यावर शरसंधान साधले आहे. पण नलावडे यांचे प्रत्युत्तर मात्र फक्त पारकर यांना उद्देशून आहे. त्यामागचे गौडबंगाल काय आहे ? हे नलावडे यांनी स्पष्ट करावे.जेव्हा नलावडे आणि राणेही नव्हते तेव्हापासून पारकर राजकारणात आहेत. त्यांनी पदाची अपेक्षाच कधी केली नाही. जी पदे मिळाली ती त्यांनी हिमतीवर मिळवली आहेत. पारकर यांनी कोणत्याही पक्षाशी गद्दारी केलेली नाही, म्हणून सर्व पक्षांत त्यांचे मित्रत्वाचे संबंध आजही आहेत. नलावडे यांनी स्वतःच्या दुसऱ्या पक्षातल्या एकातरी मित्राचे नाव सांगावे.नेतृत्व हे गुणांवर ठरत असते. निवडणुकीत हारजीत होत असते. पारकर एकदा पराभूत झाले असतील तर स्वतः नारायण राणे आणि निलेश राणे दोनदा पराभूत झाले आहेत. मग ते तुमचे नेते नाहीत का ? की ते पराभूत झाले म्हणून त्यांचे नेतृत्व नाकारणार आहात का ?पारकर यांचे नेतृत्व कणकवलीच्या पुरते मर्यादित नाही. ते जिल्ह्याचे नेतृत्व आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते कायम त्यांच्या पाठीशी आहेत आणि भविष्यातही राहतील. नलावडे यांनी त्याची काळजी करू नये. असेही या प्रसिद्धी पत्रकात नार्वेकर यांनी म्हटले आहे.